होमपेज › Pune › पावसाअभावी चिंतेचे वातावरण

पावसाअभावी चिंतेचे वातावरण

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:12PMजिल्हा वार्तापत्र : सुहास जगताप

जिल्ह्यात सर्वच भागात मोठ्या पावसाची गरज असल्याने सध्यातरी शेतकरी आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागामध्ये पावसाने मोठी दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. पिण्याचे पाणी, चारा असे प्रश्‍न डोके वर काढू लागले आहेत. काही भागात तर 7 ते 10 जूनच्या सुमारास पाऊस झाल्यानंतर अद्याप पावसाने तोंड दाखविले नाही.

6 जूननंतर काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होणार याची चर्चा लोक करीत होते. पण, त्यानंतर मोठ्या भागात पूर्ण उघडीप तर अनेक ठिकाणी आजअखेर रिमझिम पाऊस होत असून, ऊन-सावलीचा खेळ  चालू आहे. वारे जोरदार वाहत आहेत. ढग येत आहेत; पण पाऊस पडत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिरायती भागात तर अजून मशागती सुरू होतील एवढाही पाऊस झालेला नाही; तर पेरण्यांची चर्चाच नको, अशी स्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने नद्या, ओढे, नाले कोरडेच आहेत त्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे.

चार्‍यासाठी पावसाची गरज 

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जिरायती भागात पेरण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. विहिरींची पातळी खालावली असून, शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई होत आहे. चारा उपलब्ध होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. बागायती भागातही उसाच्या लागवडी कराव्यात की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत. 

ऊस लागवडी, पेरण्या खोळंबल्या

बारामती तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दिलेल्या ओढीचा फटका आडसाली ऊस लागणींवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. आडसाली ऊस लागणी 1 जुलैपासून सुरू केल्या जातात. त्यासाठी शेतकर्‍यांनी सर्‍या काढून ठेवल्या आहेत. परंतु पावसाचा अंदाज येईनासा झाला असल्याने ऊस लागणी करण्यासाठी शेतकरी कचरत आहेत. आंबेगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसाने  ओढ दिली आहे. सातगाव पठार भागात लागवड केलेल्या बटाटा पिकासाठी पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे. डोंगरी भागातील आहुपे, भीमाशंकर परिसरात भात आवणीची कामे पावसाअभावी रखडली आहेत. लोणी धामणी दुष्काळी भागात पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली. ओतूर परिसरात गेल्या आठवड्यात एकदा पाऊस झाला; मात्र तो पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. येथील शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत.इंदापूर तालुक्यातील शेळगाव गोतोंडी भागात मागील पावसाने ओढ दिली असून, जमिनीतील ओल सुध्दा कमी झाली आहे.

यामुळे या भागात पुढे पाऊस पडेल या आशेने शेतकर्‍यांनी काही भागात मकेचेे पीक घेतले होते. परंतु पावसाने ओढ दिल्याने सध्या या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतीची मशागतीची सर्व कामे रखडलेली आहेत. शिरूरच्या बेटभागात पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. आठ दिवसापासून पिंपरखेड आणि परिसरात पावसाने ओढ दिली आहे.त्यामुळे खरीप हंगामातील कामे मंदावली आहेत. पुरंदर तालुक्यातील पश्चिम सुरुवातीला दमदार पाऊस पडला; पण नंतर मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

वाटाणा अडचणीत

पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात नगदी वाटाणा पिकाची मोठ्या प्रमाणात  पेरणी झाली असून, आता पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. रांजणगाव परिसरातील नागरिक व शेतकरी गेले तीन, चार आठवड्यांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाने ओढ दिल्याने काही ठिकाणी येत्या आठवड्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.

सर्वाधिक पावसाच्या वेल्ह्यातही ओढ

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या वेल्हे तालुक्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस पडला आहे. गत वर्षीच्या तुलनेत चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीत जवळपास एक टीएमसी कमी पाणीसाठा आहे. भात पिकांच्या रोपाच्या पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या असल्या तरी पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. जनावरांना अद्याप पुरेशा प्रमाणात चारा झाला नाही. गेले आठ दिवस चासकमान धरणाच्या परिसरातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

ऊस उत्पादकही चिंतेत

सोमेश्वरनगर परिसरात 23 जूनपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. सोमेश्वर कारखान्याचा लागण हंगाम जाहीर झाल्याने मागील चार दिवसांपासून शेतकरी उसाची लागण करत आहेत. परंतु त्यांचे लक्ष पावसाकडे आहे. 

उजनी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्येही पावसाची दडीच

उजनी धरणाच्या ‘बॅकवॉटर’ परिसरातील भिगवण भागात 9 जून रोजी 52 मि.मी. व 22 जून रोजी 56 मि.मी. असा पाऊस झाल्यानंतर आजपर्यंत पावसाने दडी मारली आहे. सुरुवातीच्या पावसाने दिलासा मिळाला. त्यावर पिकांना जीवदान मिळाले. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ऊस, डाळिंबाचे, द्राक्षे व इतर भुसार पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. ‘बॅकवॉटर’च्या इतरही भागात पावसाने दडी मारली आहे. पावसाने उघडीप दिल्याने भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात घट झाली आहे. अनेक भागात पाझर तलाव कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.