Sun, Sep 23, 2018 06:09



होमपेज › Pune › संगणक अभियंत्याचा कोंढव्यात तिघांकडून खून

संगणक अभियंत्याचा कोंढव्यात तिघांकडून खून

Published On: Jan 21 2018 7:22AM | Last Updated: Jan 21 2018 7:22AM



पुणे : प्रतिनिधी

प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंगल्यासमोर पार्क करण्याच्या वादातून संगणक अभियंत्या तरुणाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना लुल्लानगर परिसरातील सहाणी सुजाण पार्क भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नेवल बोमी बत्तीवाला (31, सहाणी सुजाण पार्क, लुल्लानगर कोंढवा) असे मृत संगणक अभियंत्याचे नाव आहे. गणेश जयवंतराव रासकर (31), योगेश दिनू कडवे (22, मोहित टॉवर, सहानी सुजाण पार्क, लुल्लानगर कोंढवा), विक्रम लक्ष्मण भोंबे (32, रासकर पॅलेसमागे, बिबवेवाडी)
अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हवालदार मुनीर अब्बास इनामदार यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात  फिर्याद दिली आह

संगणक अभियंता नेवल बोमी बत्तीवाला यांचा कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे सहाणी पार्कमध्ये बंगला आहे. रासकर, कडवे, भोंबे यांच्या प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. ते नेवल याच्या बंगल्यासमोर त्यांची वाहने पार्क करत होते. या कारणावरून नेवल व तिघांमध्ये वाद झाले होते.

दरम्यान शुक्रवारी त्यांनी पुन्हा नेवल यांच्या घरासमोर त्यांची वाहने पार्क केली. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यांनी आपण प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी असल्याचे नेवल यांना सांगितले. नेवल यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यानंतर तिघांनी नेवल यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना दगड फेकून मारला. नेवल या मारहाणीत गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. दरम्यान गंभीर जखमी नेवल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ पसार झालेल्या तिघांनाही अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक ए. एम. सोनवणे पुढील तपासकरत आहेत.

स्वत: रुग्णालयात पोहोचले

नेवल आणि तिघांमध्ये झालेला वाद कोंढवा पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मिटला होता. नेवल जखमी अवस्थेत स्वतः खासगी रुग्णालयात गेले. रात्री सव्वानऊ वाजता त्यांना अ‍ॅडमिट केल्यानंतर पोलिस जबाबासाठी गेले. तोपर्यंत त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. जबाब नोंदविणे सुरू असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला.