Fri, Feb 22, 2019 16:05होमपेज › Pune › संगणक अभियंत्याची आत्महत्या

संगणक अभियंत्याची आत्महत्या

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी 

संगणक अभियंत्याने राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. समीर दशरथ पांचाळ (28 वर्षे  रा. वैष्णव अपार्टमेंट , मानाजीनगर,नर्‍हे ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर पांचाळ हा कोथरुड येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो. तो त्याच्या पत्नीसह नर्‍हे येथील मानाजी नगर परिसरात राहतो. तो मुळचा ठाणे येथील असून त्याची आई तेथे राहते. तर त्याचे नावेतवाईक विश्रांतवाडी परिसरात राहण्यास आहेत. गुरुवारी त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर तो शुक्रवारी कामावर जाऊन परत आला. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो घरी होता.  मागील दोन दिवसांपासून त्याचे पुण्यातील नातेवाईक त्याला फोन करत होते. परंतु तो फोन उचलत नसल्याने ते मंगळवारी सकाळी नर्‍हे येथे त्याच्या घराकडे आले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याने व कोणीच आतून प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी थेट नर्‍हे चौकी गाठली.

पोलिस तेथे आले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. त्यावेळी स्वयंपाक खोलीतील छताला असणार्‍या पंख्याच्या हुकला दोरी व ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वीच गळफास घेतला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.