खासगी रुग्णालयामध्ये कोरोना चाचणीची सक्‍ती

Last Updated: May 22 2020 1:25AM
Responsive image


पुणे : पुढारसेवा
 खासगी रुग्णालयांकडून इतर आजारांच्या रुग्णांना दाखल करून घेताना कोरोना चाचणीच्या अहवालाची मागणी केली जात आहे. त्यामुळे इतर आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात जाणार्‍या रुग्णांना खासगी रुग्णालयाच्या या भूमिकेने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे धक्‍कादायक प्रकार घडले आहेत. त्यामध्ये रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयांनी दमा, हृदयविकार, उच्च रक्‍तदाब, अंगदुखी अशा अन्य आजारांच्या उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना कोविड-19 चाचणी बंधनकारक केली जात आहे. 

ही तपासणी केल्याशिवाय संबंधित रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात प्रवेश दिला जात नाही.  सद्य:स्थितीला महापालिका केवळ कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांची चाचणी केली जाते. खासगी ठिकाणी ही चाचणी करायची असेल, तर चार ते पाच हजार रुपये खर्च करावा लागतो. तसेच, या चाचणीचा अहवाल येण्यास दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत.