होमपेज › Pune › तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा उपक्रम

उद्यानांत कंपोस्ट खत प्रकल्प

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:36PM

बुकमार्क करा

तळेगाव दाभाडे : वार्ताहर 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उद्यान विभागाकडून शहरातील उद्याने आणि बगीचामध्ये कंपोस्ट खत तयार करण्याचे कंपोस्ट बेड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाने दिली. 

नगरपरिषदेच्या हद्दीतील स्टेशन विभागात 11 उद्याने असून गाव विभागात 5 उद्याने आहेत. अशी शहरात जवळजवळ एकूण 16 उद्याने आणि बगीचा आहेत. त्यातील पालापाचोळा आणि कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करण्याची संकल्पना मुख्याधिकारी वैभव आवारे यांची असून उद्यान विभागाकडून कंपोस्ट बेड तयार करण्यात येत आहते. शहरातील विविध उद्यानामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 3.60 मीटर बाय 1.50 मीटर बाय 0.9 मीटर  आणि 9 इंच जाडीचे भिंतीचे बांधकाम उभारून कंपोस्ट बेड तयार करण्यात येणार आहेत.

या बेडमध्ये उद्यानामध्ये रोज जमा होणारा पालापाचोळा आणि इतर कचरा टाकून त्यावर कचरा कुजविणारी औषधे, पावडर मारून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. शहरातील राव कॉलनी उद्यानात 2 कंपोस्ट बेड आणि डोळसनाथ कॉलनी उद्यानात 1 कंपोस्ट बेड तयार करण्यात येणार आहे. तसेच स्टेशनवरील गोडांबे उद्यानात 2 कंपोस्ट बेड, शहा उद्यानात 1, हरणेश्वर 1, इंद्रायणी कॉलनी 1, नाना भालेराव कॉलनी 1, नाना भालेराव ग्रंथालय 1, वतननगर 1 अशा 12 उद्यानात हे कंपोस्ट बेड पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचे उद्यान निरीक्षक विशाल मिंड यांनी सांगितले. यामुळे उद्यानातील पालापाचोळ्यापासून उद्यानाकरिता खत मिळणार आहे. दर महिन्याला अशा प्रकारचे खत मिळाल्याने नगरपरिषदेचा उद्यानातील खतासाठी होणारा खर्च कायमचा वाचणार आहे, असेही मिंड यांनी सांगितले.