होमपेज › Pune › अनधिकृत होर्डिंग्जमुळे परिसर विद्रूप

अनधिकृत होर्डिंग्जमुळे परिसर विद्रूप

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:15AMकोंढवा : सुरेश मोरे

सुंदर प्रवेशद्वार आणि शहर परिसरात शिरताच लहानपणाच्या खाणाखुणांची ओळख सध्या लुप्त पावत चालली असून, हवाहवासा वाटणारा परिसर अनधिकृत होर्डिंग्जमुळे ओळखेनासा झाला आहे. 3 प्रभागात मिळून आवघ्या 104 होर्डिंग्जना पालिकेने परवानगी दिली असताना, परिसरात अनेक होर्डिंग्ज अनधिकृत पाहायला मिळत आहेत. यावर महापालिकेने धडक कारवाई केली नाही तर, परिसराचे विद्रुपीकरण वाढत जाणारा आहे.

कोंढवा खुर्द, वानवडी, कोंढवा बुद्रूक, महंमदवाडी, उंड्री, पिसोळी या परिसरात सध्या अनधिकृत होर्डिंग्जचे पेव फुटले असून, साध्या कार्यक्रमाचे मोठ मोठे होर्डिंग्ज लावले जात आहेत. ते लावताना मुख़्य चौक, रस्ते, पथदिव्याच्या खांबावर, बसथांब्यावर, दिशादर्शक फलकावर, भिंतीवर जेथे जागा सापडेल त्या ठिकाणावर होर्डिंग्ज लावून शहर परिसराचे विद्रुपीकरण वाढविण्याचे काम केले जात आहे. हे थांबविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातूनच नव्हे तर, सर्वस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. आपला परिसर स्वच्छ सुंदर दिसण्याबरोबरच त्याची जूनी ओळख पुसता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. नवखा व्यक्ती यामध्ये हारवून जातोच जातो, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जात-येत असलेली जुनी व्यक्ती चौकाचौकांतील होर्डिंग्जमुळे संभ्रम अवस्थेमध्ये पाहायला मिळते. चौकाला व रस्त्याला शोभून दिसतील असे एकही होर्डिंग्ज पाहायला मिळत नाही. काही मोठे तर काही लहान होर्डिंग्ज पाहायला मिळतात. जागा व्यापून गेली की काहीजण पदपथावरील दिव्याच्या खांबावर छोटी छोटी होर्डिंग्ज लावून आपणही या शर्यतीमध्ये आहोत याची चुणूक दाखवितात. यामध्ये चढाओढीने होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धा पाहायला मिळते. मात्र परिसराचे विद्रुपीकरण वाढते त्याकडे कुणाचे लक्ष्य जात नाही. होर्डिंग्जवरचा आपला फोटो कसा दिसतो यासाठी शंभर जणांकडे विचारणा केली जाते. मात्र होर्डिंग्जची गर्दी पाहून कोणी आपला गाव अथवा शहर, यामध्ये दडले गेले का याचा विचार कोणी करताना दिसत नाहीत.

वानवडी, कोंढवा, महंमदवाडी भागात एकही चौक असा नाही की, त्या ठिकाणी होर्डिंग्ज नाही. प्रत्येक ठिकाणी जाहिरातबाजी चकमकते फोटो आणि त्यावरील मजकूर चालकाने चालू गाडीतून वाचला तर अपघात ठरलेला. असे अपघातही घडलेत. काही रुपयांच्या फायद्यासाठी पालिका प्रशासनाने होर्डिंग्जला परवानगी दिली आहे. मात्र याच होर्डिंग्जमुळे शहर परिसराचा बकालपणा वाढला गेला याकडे लक्ष्य द्यायला नको का? चौक रस्ते गुदमरून जातायत गावचे गावपण लुप्‍त पावत आहे. रस्त्यावर करण्यात आलेला विकास या होर्डिंग्जमुळे दिसेना असा झाला आहे. पालिकेने ज्या होर्डिंग्जला परवाने दिलेत त्यावर तशी माहिती नाही. एका वर एक फुकट हे तत्त्व काहीजण अवलंबतात. परवानगी असलेल्या होर्डिंग्जच्या बाजूला अनधिकृत होर्डिंग्ज लावलेला पाहायला मिळेल. परवानगी कोणाला दिली हे पालिका प्रशासनाच्याही लक्षात येत नाही. अनेक ठिकाणी होर्डिंग्जमुळे रस्त्यावर लाईट पडत नाहीत. कधी तरी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होताना दिसते. सातत्याने कारवाई झाली तर, नक्कीच होर्डिंग्जवर आळा बसू शकतो. कारवाईत सातत्य ठेवले तरच रस्ते, चौक, दिशादर्शक फलक मोकळे श्‍वास घेऊ शकतील, असे मत नागरिक व्यक्‍त करत आहेत.

स्मार्ट सिटीचा पाया ठरू शकतो

महापालिकेने व राजकीय नेत्यांनी ठरविले, तर परिसरातील अनधिकृत होर्डिंग्जवर त्वरित आळा बसू शकतो. मात्र, यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्रित विचार करून, हा विषय पालिकेत मांडायला हवा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षनेते यांनी परिसराच्या भल्यासाठी व शहराच्या भवितव्यासाठी यावर तोडगा काढायला हवा. तुमचा निर्णय स्मार्ट सिटीचा तो एक उज्ज्वल पहिला पाया ठरू शकतो, अशी चर्चा नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे.