Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Pune › पालखी मार्ग दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : बापट 

पालखी मार्ग दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : बापट 

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी 

पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. पालखी मार्गासाठी भूसंपादन करताना बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यात यावा. त्याचबरोबर आळंदी-देहू मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी केल्या आहेत.

विधान भवनातील सभागृहात पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी वारी पूर्वतयारीविषयक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे उपस्थित होते.आषाढी वारी हा जनतेच्या श्रद्धेचा विषय असून, राज्य आणि परराज्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. 

या वारकर्‍यांना केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी करा, वारीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस विभागाने सतर्क राहावे, पंढरपूर आषाढी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बापट यांनी दिल्या आहेत.