Sun, May 26, 2019 12:40होमपेज › Pune › एक दिवसात एकवीस हजार सूर्यनमस्कार

एक दिवसात एकवीस हजार सूर्यनमस्कार

Published On: Jan 25 2018 1:19AM | Last Updated: Jan 24 2018 11:23PMपुणे ः प्रतिनिधी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी, पुणे येथे रथसप्तमीनिमित्त एकवीस हजार सामुदायिक सूर्यनमस्कार उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम व माध्यमिक विभागातील 2095 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

श्री म्हाळसाकांत विद्यालयाच्या क्रीडा संकुल क्रीडांगणावर सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यालयाचे प्राचार्य अन्सार शेख व आंतरराष्ट्रीय योगपट्टू व भारतीय योगा संघाचे प्रशिक्षक यांच्या हस्ते ओंकार प्रतिमेचे पूजन करून सदर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय योगा संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घेण्यात आले. पुणे डिस्ट्रिक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूट पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय पंचाच्या मदतीने सूर्यनमस्कार उपक्रम घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योगासन खेळाडू श्रेया कंधारे, धनश्री पाटील, दत्तात्रय काळे, शुभम जाधव यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारचे डेमो दिले. 

विद्यार्थ्यांच्या अंगी शारीरिक सुदृढता यावी, योगासनातील विविध आसनांची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना नियमित सूर्यनमस्कार करून प्रकृती योग्य राहावी याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार अंगीकृत करण्यासाठी आजपासून नियमित सूर्यनमस्कार घालावे. यातून होणारा व्यायाम फायदेशीर असतो, असे चंद्रकांत पांगरे यांनी सांगितले. तर प्राचार्य अन्सार शेख म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी चालणे व सूर्यनमस्कार नियमित केले तर आपण दीर्घायुष्य होऊ, अभ्यासाबरोबर व्यायाम नित्याचा आहे. 

या वेळी मुख्याध्यापिका शैलजा गायकवाड, अंजली फर्नांडिस, उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे, उपमुख्याध्यापक दीपक साळुंखे, पर्यवेक्षक रोहिदास ठाकूर, आंतरराष्ट्रीय खेळाडू सिंधू मोरे, दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार,  पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे यांनी आभार, तर प्रा. शरद सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक प्रा. अनिल दाहोत्रे, प्रा. शरद सस्ते, प्रा. अशोक आवारी, प्रा. सिंधू मोरे, प्रा. मंदार देसाई व प्रा. ज्ञानेश्वर चिमटे, क्रीडा संचालक बाळासाहेब उदावंत यांनी केले.