Thu, Jul 18, 2019 16:47होमपेज › Pune › ‘इंद्रायणी’ च्या प्रदूषणाची तक्रार थेट पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालयाकडे

‘इंद्रायणी’ च्या प्रदूषणाची तक्रार थेट पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालयाकडे

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:22AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत सांडपाणी व उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. कुदळवाडीत भंगार जाळले जाते त्याचे पाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते. यामुळे नदीची गटार गंगा झाली आहे. नदीच्या प्रदुषणाबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे हजारो तक्रारी प्राप्त झाल्या असून याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे, प्रदूषणास जबाबदार उद्योगांवर कारवाईची मागणी केली असता पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत असमर्थता दाखवत आहेत. हे दुर्दैव असल्याची टीका खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  आगामी काळात राज्य सरकार समवेत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरुर लोकसभा मतदार संघात येत असलेल्या भोसरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आढळराव यांनी गुरुवारी (दि. 5)  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते. 
चिखली, कुदळवाडी परिसरात मोठया प्रमाणात भंगाराची गोदामे असून स्क्रॅप जाळले जात असल्याने या परिसरात प्रदुषण वाढले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना प्रशासन सबंधितांंवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. कारवाई केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे उत्तर प्रशासनाकडून दिले जाते, हे चुकीचे आहे. सर्वपक्षाच्या लोकांना विचारात घेऊन कारवाई केली पाहिजे, असे खासदार आढळराव पाटील म्हणाले. 

केंद्रीय पर्यावरण समितीची दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली. त्यात  इंद्रायणी नदी प्रदुषण आणि चिखली, कुदळवाडी परिसरातील प्रदुषणाबाबत गांभीर्याने चर्चा झाली. या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा असून राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार आणि मी देखील या समितीत आहे. समितीने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत आपण लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.शास्तीकराच्या धोरणानुसार किती मिळकतींना शास्तीकर माफी मिळाली. या प्रश्नावर आयुक्त हर्डीकर यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातील 600 स्केवर फूटाच्या आतील 33 हजार 305 घरांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ होऊ शकतो.

त्याद्वारे 51 कोटी रुपये दंड माफ होऊ शकतो. परंतु, याबाबतचा मंत्रीमंडळाचा आदेश प्राप्त झाला नाही. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास भोसरीतून केवळ 18 तर शहरातून 56 अर्ज आल्याचे  सांगितले. नियमावलीत जाचक अटी-शर्ती आहेत. गुंठ्याला तीन ते चार लाख रुपये भरावे लागतात. त्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे आयुक्तांनी सांगितल्याचे ते म्हणाले.चर्‍होलीत  समूहशिल्प उभारण्याचे काम मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे ते म्हणाले. सुलभा उबाळे म्हणाल्या, उद्योगधंद्याचे रसायणमिश्रीत पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते ते बंद करावे. अन्यथा पालिकेच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. तसेच अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या नियमावलीत जाचक अटी आहेत. त्यामुळे नियमितीकरणासाठी अर्ज येत नाही. 

भोसरीत अतिक्रमणांवर पोसले जाताहेत गुंड

भोसरी परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजूस परिसर बकाल झाला आहे. सर्रासपणे पत्राशेड, टपर्‍या थाटल्या जात आहेत. स्मार्ट सिटीची वाट लागली आहे. अतिक्रमणांच्या माध्यमातून गुंड पोसले जात असल्याचा आरोप खा. आढळराव यांनी केला. भोसरीत टपर्‍या असल्याचे माहित नसल्याचे आयुक्त सांगतात, हे हास्यास्पद आहे. आठ दिवसात या टपर्‍यांवर कारवाई करावी.  तसेच टपर्‍यांच्या माध्यमातून गुंडगिरी करणार्‍यांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी खा. आढळराव यांनी केली.