Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Pune › पोलिसांविरोधात तक्रारींचा पाऊस!

पोलिसांविरोधात तक्रारींचा पाऊस!

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 11:47PMपुणे : अक्षय फाटक

आमची तक्रारच दाखल केली गेली नाही... चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याचा तपास केला... अटक चुकीच्या पद्धतीने केली... समोरच्या पार्टीला पोलिस सामील झाले... खोट्या गुन्ह्यात अडकविले... या आहेत, सामान्य नागरिकांकडून पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारी...गेल्या चार महिन्यांत पोलिसांविरोधात तक्रारींचा पाऊस पडला असून, त्यातही पुणे व पुणे ग्रामीण पोलिसांविरोधात सर्वाधिक 79 तक्रारी पुणे पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे दाखल झाल्या आहेत. तर, सोलापूर पोलिसांचा दुसरा क्रमांक लागला असून त्यांच्याविरोधात 20 तक्रारी प्राधिकरणाला प्राप्त झाल्या आहेत. 

पोलिसांविरोधातील तक्रारीमध्ये महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. वर्षाला 9 हजारांच्या जवळपास पोलिसांविरोधात तक्रारी येत असतात. पोलिसांविरोधात तक्रार आल्यानंतर त्याची वरिष्ठांकडून चौकशी केली जाते. परंतु, अनेक प्रकरणात तक्रारदाराला न्याय मिळत नाही. तर, अनेक तक्रारींची दखलही घेतली जात नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे पोलिसांविरोधात तक्रार कोणाकडे करायची आणि पोलिसांनी केलेल्या अन्यायाची दखल अथवा न्याय कोणाकडे मागयाचा, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत असतात. 

गृहविभागाकडून पोलिसांविरोधातील तक्रारीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार नोव्हेंबर 2017 मध्ये पोलिस तक्रार प्राधिकरण विभाग सुरू झाला. मुंबईनंतर पुण्यात हा विभाग सुरू करण्यात आला. या ठिकाणी पुणे शहरासह ग्रामीण पोलिस, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पोलिसांविरोधात तक्रार करता येऊ शकते. तक्रार प्राधिकरण सुरू झाल्यानंतर पोलिसांविरोधातील तक्रारारींचा पाऊस पडत आहे. अद्यापही नागरिकांना पोलिसांविरोधात तक्रार करता येऊ शकते, याची माहिती झाली नसल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे या तक्रारीची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. 

या विभागाकडे गेल्या चार महिन्यांत पोलिसांविरोधात 107 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी या पुणे शहर व ग्रामीण पोलिसांविरोधातील आहेत. चार महिन्यांत तब्बल 79 तक्रारींची नोंद असून पुणे पोलिसांविरोधातच सर्वाधिक तक्रारी असल्याचे सांगण्यात आले आहे. सोलापूर पोलिसांचा दुसरा क्रमांक लागला असून, त्यांच्याविरोधात 20 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर, सातारा पोलिसांविरोधात 7 तक्रारी आल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांविरोधात 1 तक्रार आली आहे. सांगली पोलिसांविरोधात अद्याप तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चार महिन्यांत प्राधिकारणातील 41 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, 66 तक्रारींची चौकशी सुरू आहे. 

नोव्हेंबर 2017 

दोन महिन्यांत प्राधिकरणाकडे 16 तक्रारी आल्या होत्या. त्यातील 13 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तर, 3 प्रकरणांची चौकशी सुरू होती. 

अशी करा तक्रार

नागरिकांनी पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी विभागीय तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, अनंत हाईट्स, जाधवनगर, नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे 68 या ठिकाणी संपर्क करायचा आहे. दरम्यान, विभागीय तक्रार प्राधिकरणात शिपाई ते पोलिस निरीक्षकांपयर्र्ंत नागरिक कोणाबद्दलही तक्रार करू शकतात. परंतु, त्यापूर्वी नागरिकांनी याबाबत संबंधित अधीक्षक किंवा पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. तीन महिन्यांत त्यावर कार्यवाही न झाल्यास किंवा त्यांनी केलेल्या कारवाईवर समाधान न झाल्यास प्राधिकरणात तक्रार करायची आहे. नागरिक (वलिर्रिीपशऽसारळश्र.लेा) या संकेतस्थळावर तसेच टपालाने किंवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करू शकतात. 

प्राधिकरणाचा पहिलाच निकाल

प्राधिकरणाकडे तक्रार आल्यानंतर याची चौकशी केली जाते. चौकशीत संबंधित पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी संबंधित आयुक्‍त किंवा अधीक्षकांना प्राधिकरणाकडून निर्देश दिले जातात. त्यानुसार, प्राधिकरणाने नुकताच पहिला निकाल दिला आहे. पुण्यातील एका तक्रारीत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी व्यावसायिकाला कोणताही पुरावा नसताना गुन्ह्यात अकडवून पदाचा दुरुपयोग केला. या प्रकरणात जाधव व उपनिरीक्षक आर. एम. घुगे हे दोषी असून त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी म्हणून पुणे पोलिस आयुक्त व शासनाला आदेशाची प्रत पाठविली आहे. त्यावर पुढे अद्यापही काही कारवाई झालेली नाही.