Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Pune › ‘इतके दिवस मी केलं आता तिनं करावं’ पतींच्या तक्रारीत वाढ

‘इतके दिवस मी केलं आता तिनं करावं’

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 4:14PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पत्नी मुलांचा सांभाळ करत नाही... समजून घेत नाही... अशा पुण्यातील पतीराजांच्या पत्नीविरोधातील तक्रारी तर आहेतच; शिवाय नोकरी करत असतानाच तिनं घराकडेही नीट लक्ष  दिले पाहिजे, अशी अपेक्षाही अनेकांकडून व्यक्त केली जाते.   त्यातही पत्नी नोकरी करत असेल तर तक्रारी आणखी वाढतात. ‘ तू नोकरी करतेस, मग तुझा खर्च तूच कर,’ असे सुनावण्यासही पती मागेपुढे पाहत नसल्याचे अनेक प्रकरणांत दिसून येत आहे.  पत्नीविरोधात पतीकडून येणार्‍या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गतवर्षी 400 जणांनी पत्नीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. दोघांची समजूत काढत त्यांचा संसार पुन्हा सुरळीत व्हावा यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. 

 दाम्पत्यामधील किरकोळ वादाचे रूपांतर संसार मोडण्यापर्यंत जाते. अनेकदा त्याला तात्कालिक कारणे असतात. रागाच्या भरात वाद होतात; परंतु पोलिस ठाण्यातपर्यंत प्रकरण येते आणि एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या जातात. त्यामुळे संसार मोडकळीस येतो.  पोलिस ठाण्यात अशा जोडप्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे शक्य होत नाही; त्यामुळे पुणे पोलिस दलात महिला सहाय्य कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी कौटुंबिक वाद मिटवून त्यांचा संसार पुन्हा गुण्यागोविंदाने चालावा, यासाठी  प्रयत्न केले जातात. 

महिला सहाय्य कक्षाकडे गेल्या वर्षभरात (2017) 2 हजार 360 अर्ज आले आहेत. त्यात 2016 च्या तुलनेत यंदा पाचशे तक्रारी वाढल्या आहेत.  या वाढत्या तक्रारींवरून समाजात होत असणार्‍या बदलांची कल्पना  येत आहे. एकीकडे राज्यात महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कायद्यात महिलांच्या सुरक्षितता आणि हितासाठी कायदे आहेत; परंतु पुरुषांना महिलांकडून होणारा त्रास आणि अत्याचार्‍यांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांना नेमके काय करायचे, असाच प्रश्‍न पडतो. महिलांसोबतच परुषांच्या तक्रारींमध्येही वाढ होत आहे. त्यात किरकोळ कारणे आहेत; परंतु तक्रारींमधील होणारी वाढ सामाजिक बदल दाखवत आहे.  

पत्नी मुलांचा नीट सांभाळ करत नाही; तसेच काही अडचणीच्या काळात किंवा एखाद्या गोष्टीत समजून घेत नाही, अशी कारणे दोघांच्या वादाची ठरत आहेत. त्यातही पत्नी नोकरी करत असल्यास दोघांमध्ये आणखीनच वाद होतात. नोकरी करते, मग तिचा खर्च तिने करावा आणि इतक्या दिवस मी खर्च केला, आहे तर आता घरात तिने खर्च करावा, अशाही कारणांमुळे वाद होत आहेत. 

सुशिक्षित म्हणविणार्‍या कुटुंबांमध्येच वादाचे प्रमाण जास्त आहे. त्यातही दोघेही नोकरी करत असणार्‍या जोडप्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद वाढत जातात, असे निरीक्षण महिला सहाय्य कक्षाच्या पोलिस निरीक्षक कल्पना जाधव यांनी केले आहे.