Wed, Jan 23, 2019 14:50होमपेज › Pune › पॅन्ट फाटली; पीएमपीवर गुन्हा 

पॅन्ट फाटली; पीएमपीवर गुन्हा 

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:46AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

पुणेकरांच्या हाकेला धावणारी पण, त्यांचा जीव घेणारी तसेच आदळत-आपटत प्रवास देणारी म्हणून ओळख असलेल्या पीएमपीएल बसने बुधवारी एका पासधारक प्रवाशाच्या पॅन्ट फाडली. दरम्यान प्रवाशाने सुध्दा पीएमपी प्रशासनाला चांगलाच धडा शिकवत थेट बस पोलिस चौकीत नेली आणि प्रशासनाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून प्रशासनावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व घटनेने शहरात दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. 

भारती पोलिस ठाण्यात पीएमपी प्रशासनाच्या विरोधात तक्रार दिलेल्या प्रवाशाचे नाव संजय शितोळे असे आहे. शितोळे हे पीएमपीचे पासधारक आहेत. ते पीएमपीने दररोज प्रवास करीत आहेत. बुधवारी सकाळी शितोळे शिवाजीनगर येथून जांभूळवाडीला जात असलेल्या बसमध्ये पद्मावती येथे बसले. त्यांना कात्रज येथे जायचे होते. या प्रवासा दरम्यान सीटच्या निघालेल्या मेटलच्या पट्टीने त्यांची पँट फाटली. ही बाब लक्षात येताच शितोळे यांनी बस थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नेली आणि पीएमपी प्रशासनाच्या विरोधात तक्रार दिली. 

पोलिसांनी या तक्रारीनुसार पीएमपीच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखलकेला आहे. याबाबत प्रवाशी संजय शितोळे  म्हणाले, या पूर्वी देखील बसमधून प्रवास करीत असताना शर्ट फाटला होता. त्याबाबत पीएमपीच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली होती.परंतु; प्रतिसाद मिळाला नाही. वास्तविक पाहता मी पीएमपीचा दैनंदिन पासधारक प्रवासी आहे. प्रत्येक महिन्याला 1 हजार 400 रुपयांचा पास काढतो. मला सुरक्षित प्रवास करता यावा, अशी अपेक्षा आहे. मात्र बसमध्ये वारंवार कपडे फाटणे, इजा होणे असे प्रकार होत असल्यास पीएमपी प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पॅन्ट फाटल्यावर बस थेट पोलिस चौकीत नेली असल्याचे त्यांनी सांगितले.