Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › उद्धट कर्मचार्‍यांविरोधात तक्रारींचा पाऊस

उद्धट कर्मचार्‍यांविरोधात तक्रारींचा पाऊस

Published On: Aug 30 2018 1:23AM | Last Updated: Aug 30 2018 1:16AMपुणे : निमिष गोखले

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उद्धट कर्मचार्‍यांविरोधात 24 तास सुरू असणार्‍या कॉल सेंटरवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.  दहा महिन्यात राज्यातील एसटीचे चालक, वाहक व अन्य कर्मचार्‍यांबाबत गैरवर्तणुकीच्या तब्बल 300 तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.  तर एसटीबाबत एकूण 2800 तक्रारींची नोंद कॉल सेंटरवर झाली. यापैकी सुमारे 2100 तक्रारी सोडविल्या गेल्याचा दावाही एसटी महामंडळाने केला आहे. ई-तिकिटांबाबत सर्वाधिक 500 तक्रारी  असून  अनेक बसेसमध्ये जुन्याच पद्धतीने तिकिटे देण्यात येत असल्याचे चित्र आहे. 

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी असे बिरूद मिरवणार्‍या एसटीबाबत प्रवाशांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संतोष माने प्रकरणानंतर एसटी प्रशासन जागे झाले आणि चालकांसाठी राज्यभर समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली. योग, व्यायामाबरोबरच समुपदेशकांकडून त्यांना वर्तणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येते; तरीदेखील चालकांची मग्रुरी सुरूच असून, प्रवाशांना नीट उत्तरे न देणे, अतिवेगाने गाडी चालविणे, थांब्यावर गाडी न थांबविणे, मोबाईलवर बोलणे, नियम तोडणे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. 

एसटीच्या सेवांबाबत माहिती होण्यासाठी 1800221250 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला. ऑक्टोबर 2017 मध्ये त्याचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले व कॉल सेंटरवरील मनुष्यबळ वाढविण्यात आले. महामंडळास प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेण्यास मदत होईल, हा या मागचा हेतू होता. परंतु, कॉल सेंटरवरील क्रमांक तक्रारींसाठीच अधिक वापरण्यात  येत आहे. राज्यातून 18 हजार एसटी बसमधून दररोज सुमारे 70 लाख प्रवासी ठिकठिकाणी प्रवास करतात. मात्र, कर्मचार्‍यांच्या स्वभावाबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने महामंडळाला कर्मचार्‍यांना वागणुकीबाबत प्रशिक्षण देण्याची आता वेळ आली आहे. 

पुणे विभागातील 185 तक्रारी

दि. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान वर्षभरात एसटीच्या पुणे विभागाच्या 185 तक्रारी कॉल सेंटरवर प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक तक्रारी बस उशिरा सोडल्याबाबत किंवा इच्छीतस्थळी उशिरा पोहोचल्याबद्दल आहेत.  वक्तशीरपणाखालोखाल सर्वाधिक तक्रारी वातानुकूलित शिवशाहीऐवजी निमआराम बस सोडल्याबाबत असून, त्या खालोखाल आयत्या वेळी बस रद्द करण्याबाबतच्या आहे. गाडी बेदरकारपणे चालवणे, मोबाईलवर बोलत गाडी चालविणे, आदी तक्रारी नगण्य आहेत.

तक्रारीचे स्वरूप                    तक्रारींची संख्या 
गैरवर्तणूक                           300
ई-तिकीट                            500
थांब्यावर बस न थांबविणे        281
एसटीला उशीर                     450
रद्द झालेल्या फेर्‍या                 55
अयोग्य स्थितीतील बस            130
ब्रेक डाऊन                          40
अस्वच्छ                              36
अनधिकृत थांबा                    25
सुटे पैसे नाही                       19
तिकीट शुल्क                       34
इतर                                   930