होमपेज › Pune › पुण्यात जिग्‍नेश मेवाणी, उमर खालीदविरोधात तक्रार

पुण्यात जिग्‍नेश मेवाणी, उमर खालीदविरोधात तक्रार

Published On: Jan 02 2018 11:10PM | Last Updated: Jan 02 2018 11:09PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील शनिवार वाड्यात झालेल्या एल्गार परिषदेत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांनी भावना भडकावणारे वक्तव्य केल्याने राज्यात दोन समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार डेक्कन पोलिसांकडे करण्यात आली आहे. अक्षय गौतमराव बिक्कड (२२) आणि आनंद गणेशराव धोंड (वय २५) यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. 

राज्यात दोन गटांमध्ये वाद सुरु असून, राज्यातील वातावरण तणावपूर्ण झालेले आहे. असे असताना डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर हद्दीचा प्रश्‍न उपस्थित करत हा कार्यक्रम विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे सांगून तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार वाड्यावर रविवारी (दि. ३१ डिसेंबर २०१७) एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिग्नेश मेवाणी व उमर खालीद यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी भाषणादरम्यान समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणी खोर वक्तव्ये केली. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे. याप्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर १५३ अ आणि ५०५ या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान, याबाबत डेक्कन पोलिसांना विचारले असता, तक्रार अर्ज आलेला आहे. मात्र, एल्गार परिषदेत शनिवार वाडा म्हणजेच, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेली असल्याने तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलिसांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी दिली.