Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Pune › शिक्षणाच्या कंपनीकरण कायद्याला विरोध : कपिल पाटील 

शिक्षणाच्या कंपनीकरण कायद्याला विरोध : कपिल पाटील 

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:25AMपुणे ः प्रतिनिधी 

राज्यात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन काम करत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या कंपनीकरण करणार्‍या कायद्याला आतापर्यंत सभागृहात विरोध करत आलो आहे. या कायद्याला विरोध केल्यामुळेच शिक्षणमंत्री विनोद तावडे माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत होते. गोरगरिबांचे शिक्षण हिरावून घेणार्‍या शिक्षणाचा कंपनीकरण करणारा कायदा होऊ देणार नाही, असा निर्धार आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. 

मुंबई शिक्षक मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांच्या सत्काराचे आयोजन राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे करण्यात आले होते. समाजवादी विजयाची हॅट्ट्रीक साजरी करण्यासाठी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या हस्ते आमदार कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, न्या. प्रकाश परांजपे, डॉ. अभिजित वैद्य, सुभाष वारे, सुशिलाताई मोराळे, अशोक बेलसरे, अतुल देशमुख आदी उपस्थित होते. 

बाबा आढाव म्हणाले, समाजवादी विचारात मतपेठी, तुरूंग आणि फावढे प्रतीक आहे. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायला हवा. समाजवादी कार्यकर्त्यांनी हतबल न होता एकत्र येऊन काम करायला हवे. डॉ. सुरेश खैरनार म्हणाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पर्याय देण्याची ताकद एकमेव राष्ट्रसेवा दलाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा दलाला वाढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.  यावेळी सुभाष वारे, सुशिलाताई मोराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.