Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Pune › शेतकर्‍यांच्या मालाला योग्य मोबदला देण्यास कटिबद्ध : राधामोहन सिंह 

शेतकर्‍यांच्या मालाला योग्य मोबदला देण्यास कटिबद्ध : राधामोहन सिंह 

Published On: Apr 22 2018 1:29AM | Last Updated: Apr 22 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

देशभरातील शेतकर्‍यांच्या शेतातील काही पिकांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागतो. त्यावर केंद्र सरकारकडून एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य मोबदला देण्यास केेंद्र सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली. 

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरणामे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. अनिल शिरोळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते.

सिंह म्हणाले, शेतकर्‍याच्या शेताला पाणी देण्यासाठी जलसंधारणाची मोठी कामे केली जात आहेत. देशाला सक्षम करण्यासाठी शेतकरी व समाज सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. येत्या काळात एखाद्या शेतमालाचे जास्त उत्पादन झाल्यास खरेदी करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती राज्य शासनाला केंद्र शासनाकडे करावी लागणार नाही. याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आवश्यक ते बदल करण्यात येत आहे. शेतीमाल खरेदी प्रक्रिया राबविण्यापूर्वी दोन महिने आधी राज्य शासनाच्या संबंधित प्रतिनिधींची केंद्रात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविणार्‍या मुख्यमंत्र्याच्याच लातूरला रेल्वेने पाणी न्यावे लागले यावरूनच विरोधकांचे दावे किती फोल आहे हे स्पष्ट होत असल्याचे सांगून राधामोहन सिंह म्हणाले, आर्थिक जीवनमान उंचावायचे असेल तरी शेतकर्‍यांनी शेतीसह जोडधंदाही सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यांसह विविध लघु उद्योगांचा विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

येत्या काळात देशातील 22 हजार छोटे मार्केट ई-मार्केटला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या घरात वीज उपलब्ध करून दिली जात आहे; तसेच रस्ते व स्वच्छतागृह बांधून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

Tags : pune, pune news, farmer, goods, proper compensation, Radha Mohan Singh,