Wed, Mar 20, 2019 03:16होमपेज › Pune › कात्रज-कोंढवा रस्त्याला आयुक्तांची जाता-जाता मंजुरी

कात्रज-कोंढवा रस्त्याला आयुक्तांची जाता-जाता मंजुरी

Published On: Apr 07 2018 1:55AM | Last Updated: Apr 07 2018 1:47AMपुणे : प्रतिनिधी

वादग्रस्त निविदा प्रक्रियेमुळे गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामाला महापालिका आयुक्‍त कुणाल कुमार यांनी जाताजाता मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या नियमानुसार अद्याप भूसंपादन झाले नसताना 178 कोटींच्या निविदेला केवळ भाजपच्या दबावाखाली अखेरच्या क्षणी मान्यता दिल्याची चर्चा सुरू आहे. 

महापालिकेने गतवर्षी कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा खडी मशिन येथील सुमारे साडेतीन कि.मी. लांबीचा आणि 84 मी. रुंद रस्त्याच्या कामाची सुमारे 225 कोटींची निविदा काढली होती. या निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिली होती. या कामासाठी आलेल्या 4 निविदा 15 डिसेंबरला उघडण्यात आल्या. त्यामध्ये मे. पटेल इंजिनिअरींग लि.ची निविदा 17.82 टक्के कमी दराने अर्थात सुमारे 177 कोटींची आली.

मे. पटेल इंजिनिअर्स लि. ला राज्य शासनाने ब्लॅकलिस्टेड केले आहे, त्यांना हे काम देऊ नये असे पत्र माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाला दिले होते. तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी संदर्भ क्र. 10 अन्वये टेंडर अटी शर्तींनुसार मे. पटेल इंजिनिअर्स अपात्र ठरत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या मे. रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लि. ला हे काम द्यावे, असे प्रशासनाला कळविले होते. मात्र प्रशासनाने मे. पटेल इंजिनिअर्सवर केलेल्या कारवाईचा कार्यकाळ संपल्याने ते या कामाकरिता  पात्र ठरत असल्याचा अभिप्राय दिला.

या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाबाबत महापालिकेने मागील दीड-दोन वर्षात कुठलिही हालचाल केली नाही. असे असताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार सोडण्यापुर्वी शुक्रवारी मे.पटेल इंजिनिअरींग लि.च्या निविदेवर स्वाक्षरी केली आहे. लवकरच ही निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. 

 

Tags : pune, pune news, Katraj Kondhwa, road, permission,