Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये आयुक्तालयाची लगबग

पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये आयुक्तालयाची लगबग

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 12 2018 12:45AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी- चिंचवडच्या स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात आयुक्तालयाची लगबग सुरू झाली आहे. शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.10 ) याबाबतचा अध्यादेश जारी केल्यानंतर रंगरंगोटीसह इतर कामांना वेग आला आहे. 

पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत शहरी भागातील सांगवी, वाकड, हिंजवडी, भोसरी, दिघी, पिंपरी, एमआयडीसी, चिंचवड आणि निगडी या पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे. तर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून देहूरोड, तळेगाव, एमआयडीसी-तळेगाव, आळंदी, चाकण यांचा समावेश होणार आहे. या सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना आयुक्तालयात समाविष्ट होण्यापूर्वीच्या सर्व गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी दाखल आणि उघड गुन्ह्याची माहिती संकलित करण्यात अधिकारी व्यस्त आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यातील पुणे शहर असा नामोल्लेख असलेले फलकदेखील बदलावे लागणार आहेत. नियंत्रण कक्ष पिंपरी पोलिस ठाण्यानजीक पालिकेच्या व्यायाम शाळेत सुरू करण्यात येणार आहे. सर्व पोलिस ठाणी वायरलेसद्वारे पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाला जोडणार आहेत. त्यासाठी लागणारे ‘अँटेना’ छतावर बसवण्याचे तसेच व्यायाम शाळेतील साहित्य स्थलांतरित करून रंगरंगोटीचे काम शनिवारी (दि.11)सुरू होते. 13 ऑगस्टपर्यंत नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण केले जाणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे हे स्वतः या कामावर लक्ष ठेवून आहेत.

पोलिस आयुक्तालयाच्या विविध कक्षासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी असे एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्याचे ठरले आहे. उर्वरित 2 हजार 633 पदे तीन टप्प्यांमध्ये भरती करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुसर्‍या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर आणखी दोन वर्षांनी तिसर्‍या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत. 

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तलयाचे प्रथम आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती झाली आहे तर मकरंद रानडे हे अतिरिक्‍त आयुक्‍त असणार आहेत. नम्रता पाटील, विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील हे उपायुक्‍त म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय सात सहायक आयुक्त, 67 पोलिस निरीक्षक, 86 सहायक निरीक्षक, 215 उपनिरीक्षक, 373 सहायक उपनिरीक्षक, 745 पोलिस हवालदार, 1022 पोलिस नाईक, 2163 पोलिस शिपाई, 125 अकार्यकारी दल, 31 पोलिस दवाखान्यासाठी कर्मचारी आहेत.

कारभार उपायुक्त कार्यालयातूनच.. 

प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ऑटोक्लस्टरच्या इमारतीमधील दोन कक्ष आयुक्तलयासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र सध्याच्या पोलिस उपायुक्‍तालयातूनच कामकाज करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी उपायुक्‍तालयाची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम  युद्धपातळीवर सुरू आहे.