Wed, Apr 24, 2019 11:56होमपेज › Pune › प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍तांवर आयुक्‍तमेहरबान 

प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍तांवर आयुक्‍तमेहरबान 

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:04AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे तब्बल 21 विभागांचा कार्यभार सोपविला आहे. वैद्यकीय विभागाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांना आता मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांकडील खरेदीचे अधिकारही बहाल केले गेले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर हे मेहरबान असल्याने महत्त्वाच्या विभागांवर आष्टीकर हे ‘बॉस’ म्हणून मिरवत आहेत. त्या कृपादृष्टीची खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. 

सहायक आयुक्त असलेले आष्टीकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग, नागरवस्ती योजना विभाग, निवडणूक व जनगणना हे विभाग होते. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांशी जवळीक साधत त्यांनी आपल्या पदरात प्रभारी अतिरिक्त आयुक्तपद पाडून घेतले. पदासोबत पालिकेतील सर्व महत्त्वाचे विभागही त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली घेतले आहेत. 

स्थायी समितीने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय याचे खरेदीचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बुधवारी (दि.25) घेतला. यापुढे या खरेदीचे अधिकार अतिरिक्त आयुक्त आष्टीकर यांना बहाल केले आहेत. आष्टीकर यांना वैद्यकीय विभागाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे रूग्णालय व दवाखान्यासाठी औषधे व साहित्य खरेदीची तांत्रिक बाब त्यांना कशी समजणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्या जर चुकीची औषधे खरेदी केली तर, तो शेकडो रूग्णांच्या जीवांशी खेळण्याचा प्रकार उद्धभवू शकतो. नियमांनुसार मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍यानंतर दुसर्‍या पदावर कार्यरत असलेले अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सावळे किंवा सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांस ते अधिकार बहाल करणे गरजेचे होते. मात्र, आयुक्त तसेच, सत्ताधारी भाजप नेते व पदाधिकार्‍यांच्या मर्जीतील असल्याने आष्टीकरांना ते अधिकार बहाल करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आष्टीकर हे आयुक्तानंतरचे क्रमांक दोनचे अधिक प्रभावी अधिकारी ठरले आहेत. आयुक्त हर्डीकर व सत्ताधार्‍यांची आष्टीकर यांच्यावरील कृपादृष्टीची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

प्रवीण आष्टीकर यांच्याकडे असलेले विभाग

मध्यवर्ती भांडार विभाग, स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), शिक्षण विभाग (प्राथमिक), माध्यमिक विभाग, आयटीआय (मोरवाडी व कासारवाडी), निवडणूक, जनगणना, आधार, वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, पशुवैद्यकीय, विद्युत मुख्य कार्यालय, कार्यशाळा विभाग, दूरसंचार विभाग, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, झोपडपट्टी (स्थापत्य), नागरवस्ती योजना विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन, नागरी सुविधा केंद्र, प्रशासन.  

एकाकडेच अधिक विभाग दिल्याने गतिमानतेला खीळ

निव्वळ शासनाकडून नियुक्ती झाल्याने आष्टीकर यांच्याकडे ढिगभर विभाग दिले आहेत. एका व्यक्तीकडे असंख्य कामे दिल्याने गतीमान कारभारास खीळ बसणार आहे. त्याला रोखणे सोडून उलट आयुक्त खतपाणी घालत आहेत. आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय... अशी तर्‍हा झाल्याची टीका भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली. औषधे खरेदी ही अनुभवी डॉक्टरांकडून होणे अत्यावश्यक आहे. इमर्जन्सीमध्ये डॉक्टरांनाच कळणार की, कोणते औषधे लागणार आहे. हे आष्टीकरांना कसे समजणार. रुग्णालयाकडून मागणी येणार त्यानंतर ते खरेदी करणार. त्यामुळे खरेदीत विलंब होऊन रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळणार नाहीत, असेही  वाघेरे म्हणाले.