Sat, Aug 24, 2019 23:58होमपेज › Pune › ‘अदृश्य पोलिसिंग’वर आयुक्‍तांचा भर

‘अदृश्य पोलिसिंग’वर आयुक्‍तांचा भर

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:02AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही अदृश्य पोलिसिंग करण्यावर भर देणार असल्याचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले. पोलिस समोर नसले, तरी कारवाई होईल; त्यासाठी नागरिकांनी समाजात सुरू असलेल्या गैरप्रकाराचे फोटो ‘व्हॉटसअ‍ॅप’ करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

नागरिकांनी तक्रार घेऊन पोलिसांकडे जाण्यापेक्षा पोलिसांनीच नागरिकांकडे गेले पाहिजे, असे मत आयुक्त पद्मनाभन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, नागरिकांच्या फोननंतर वीस मिनिटांच्या आत त्यांना मदत पोहोचली पाहिजे. पोलिसांच्या प्रतिसादावर गुन्ह्याचे स्वरूप बदलत जाते. त्यामुळे पोलिसांनी वेळेत पोहोचले पाहिजे.  सध्या आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे रस्त्यावर पोलिस हुज्जत घालणार नाहीत. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पावत्या फाडण्यापेक्षा वाहनांचा नोंदणी क्रमांक घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ज्यामुळे रस्त्यावरील नागरिक आणि पोलिसांचा संघर्ष कमी होईल. हद्दीत गस्त घालत असताना एकटा पोलिस जाणार नाही, तसेच नाकाबंदी किंवा बंदोबस्तादरम्यान 6 ते 8 पोलिस एकत्रित तैनात असतील. हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या मोठी आहे. मला स्वतःला हिंजवडीतून बाणेरला जाण्यास दोन तास लागले. त्यासाठी तिथल्या वाहतुकीला शिस्त लावणे महत्त्वाचे आहे.

सध्या विशेष शाखा आणि गुन्हे शाखा सुरू करण्यात आली आहे. इतर अधिकारी हजर झाल्यानंतर हळूहळू आणखी विभाग सुरू होतील. पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे असलेल्या संबंधांवर आयुक्तांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पोलिस जर गुन्हेगारांना मदत करीत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. असे प्रकार आढळल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.

अधिकारी विभागणीवरून वाद नाही

पुणे पोलिस आयुक्‍तालयातून अधिकारीवर्ग करीत असताना कार्यक्षम अधिकारी निवडून घेतल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दोन आयुक्तांमध्ये या कारणाहून रस्सीखेच सुरू असल्याच्या उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. यावर आयुक्त पद्मनाभन यांनी अधिकार्‍यांच्या वर्गवारीहून कसलाही वाद नसल्याचे स्पष्ट केले. पोलिस हा फक्‍त पोलिसच असतो त्यामध्ये चांगले-वाईट अधिकारी असे काही नसते. मला मिळालेले सर्व अधिकरी हे चांगलेच आहेत. ते मी येत्या काळात सिद्ध करून दाखवतो, असे सांगून त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.