Mon, Jun 17, 2019 05:01होमपेज › Pune › भ्रष्टाचाराच्या आरोपाने आयुक्त हर्डीकर रडारवर

भ्रष्टाचाराच्या आरोपाने आयुक्त हर्डीकर रडारवर

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 11:29PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सामाजिक संघटना करीत आहेत. या प्रकरणात सत्ताधारी भाजपासह आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेही नावे गोवले जात असल्याने, ते टीकेचे धनी बनले आहेत. आपल्या जेमतेम 9 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ते विरोधकांच्या रडारवर आहे आहेत. 

या आरोपाची सुरुवात आषाढी एकादशीच्या दिंडीप्रमुखांना ताडपत्री भेट देण्यावरून झाली. अधिक दरापेक्षा वाढीव दराने ताडपत्री खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर सत्ताधार्‍यांच्या बरोबरीने आयुक्त हर्डीकर यांनी या आरोपास तत्काळ खुलासा करीत उत्तर दिले. सदर निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा एका पानाचा अहवालही देऊन टाकला. 

आयुक्तांच्या या खुलाशाने विरोधक संतप्त झाले. प्रकरणाची चौकशी करणे सोडून थेट सत्ताधार्‍यांना अभय दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने केला. भाजपाचे प्रवक्ते म्हणून आयुक्तांवर टीका केली. समाविष्ट गावांतील रस्ते कामांसाठी एकाच वेळी तब्बल 425 कोटीं रुपयांच्या निविदा मंजूर झाल्याने आयुक्तांवर टीकेचा भडिमार होत आहे. 

आयुक्तांनी एकाच दिवशी या सर्व कामांच्या फायलींवर सह्या केल्या; तसेच मुख्य लेखापाल व लेखा परीक्षकांनी यामध्ये कोणतेही आक्षेप नोंदविले नाहीत. या कामांच्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक जागा ताब्यात नाही; तसेच अर्थसंकल्पात सदर कामासाठी पुरेशा निधीची तरतूद नाही. ठराविक 12 ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून निविदेचे दर 15 ते 20 टक्के जादा दराने स्वीकारले. या कामांत ‘रिंग’ होऊन तब्बल 90 ते 100 कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा आरोप शिवसेनेच्या दोन्ही खासदार आणि राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी केला आहे. एकाच दिवशी सर्व फायलींवर सह्या केल्याने शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्यावर घरगड्याप्रमाणे काम करीत असल्याचे टीका केली. 

या तक्रारीवर चौकशी न करता, या प्रकरणात सुमारे 30 कोटींची बचत झाल्याचे उत्तर आयुक्त हर्डीकर यांनी दिले. त्यामुळे विरोधक आणखी संतप्त झाले आहेत. आयएसआय दर्जाच्या अधिकार्‍यांनी सत्ताधार्‍यांची बाजू न मांडता, या प्रकरणाच्या चौकशीची आग्रही मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शाहूनगर, चिंचवड येथील बहिरवाडे मैदानाच्या सीमाभिंतीच्या कामात ‘रिंग’च्या तक्रारीबाबत उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, ठेकेदारांनी कोणत्या संगणकावरून निविदा भरावी, यावर प्रशासन नियंत्रण ठेवत नसल्याचे उत्तर देऊन, सदर प्रकरणाचे समर्थनच केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. 

अनेक प्रकरणांच्या तक्रारी करूनही आयुक्त दखल घेत नसल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तीच भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शिवसेना व राष्ट्रवादीने दिला आहे. शिवसेना गटनेत्याच्या दालनातून संगणक जप्त करण्याच्या कृतीमुळे त्यांची पुरती बदनामी झाली. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी जुन्याच नियमांची वारंवार परिपत्रके प्रसिद्ध करून त्यांची दखल घेतली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. विरोधकांनी सत्ताधार्‍यांसह आयुक्तांनीही विविध प्रकरणांत लक्ष्य करीत, जोरदार टीका सुरू केली आहे. परिणामी, आयुक्तांच्या कामकाजाबाबत सर्वसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.