Thu, Jun 27, 2019 12:33होमपेज › Pune › खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रणिती शिंदे, यांचा सरकारवर हल्लाबोल 

महिलांच्या प्रश्‍नावरून पंतप्रधांनावर साधला निशाणा

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:05PMपुणे : प्रतिनिधी 

देशभरातील विविध भागात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या विरोधात महिलांनी पेटून उठले पाहिजे. यासाठी सरकारने पुढे येण्याची गरज आहे.सरकारने या विषयी योग्य ती पावले उचण्याची गरज आहे. मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईला एका फोटोसाठी बँकेच्या रांगेत उभे करतात आणि त्यांची पत्नी कुठे आहे हे तर त्यांना माहीतही नसेल. त्यांना महिलांच्या व्यथा काय कळणार अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी तर सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महिलांच्या प्रश्नावरून निशाणा साधला.

प्रणिती म्हणाल्या, देशातील प्रत्येक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. हे ऐकून अस्वस्थ वाटते मात्र हे सरकार त्यावर काही करताना दिसत नाही. महिलांना 33 टक्के आरक्षणावरून 50 आरक्षण देण्यात आले. त्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहे. परंतु,  दुसर्‍या बाजुला महिलांवरील  अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना लक्षात घेता शालेय जीवनापासून महिलांचा आदर केला पाहिजे असे शिक्षण देण्याची गरज आहे. 

सुळे म्हणाल्या, मला 19 वर्षांची मुलगी आहे. ती ज्यावेळी बाहेर जाते. तेव्हा मला देखील मुलीची चिंता वाटते. या सर्व घटना लक्षात घेता केंद्र सरकारने जनतेला अच्छे दिन आणले नाहीत. जीवनावश्यक वस्तूवरील दर स्थिर ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून दिवसेंदिवस महागाईमध्ये वाढ करीत आहे. किमान या सरकारने महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यावर तरी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक विशाल तांबे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होते.