Thu, Apr 25, 2019 23:39होमपेज › Pune › फोटोवाल्या खासदाराला दिल्लीपेक्षा गल्लीतच रस

फोटोवाल्या खासदाराला दिल्लीपेक्षा गल्लीतच रस

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:28AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न  गंभीर आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना खा. श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे व अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरूवात करण्याचे आवाहन केले होते. परंतु दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात फोटो काढणारा खासदार म्हणून ओळख असलेले  खासदार  बारणे हे या आवाहनामुळे प्रचंड चिडल्याचे दिसत आहे.  चांगल्या कामासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी फोटोवाल्या खासदाराने चांगल्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची  संधी साधली आहे. महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय पात्रता असलेल्या बारणे यांना दिल्लीपेक्षा गल्लीतच जास्त रस असल्याचे त्यावरून सिद्ध होते,अशी घणाघाती टीका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

आ. जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील रस्ते  प्रशस्त आहेत. तरीही शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते, त्यातून मार्ग काढण्यासाठी पालिका प्रशासन आपल्या स्तरावरून कारवाई करत असते. परंतु,यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही खा. बारणे यांना पुढे येण्याचे. तसेच विकासाची दूरदृष्टी असेल, तर ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव परिसराचा विकास करण्याचे आव्हान दिले होते. नागरिकांच्या प्रश्नांचा  कळवळा असल्यासारखे वागणार्‍या बारणे यांनी हे आव्हान स्वीकारून  अतिक्रमणांवर कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी  जनतेची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी आमच्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून प्रसिद्धी मिळवली अशी टीका जगताप यांनी केली आहे.

पंतप्रधानांपासून ते अनेक केंद्रिय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जायचे आणि एखादे निवेदन देऊन त्यांच्या सोबत फोटोसेशन करायचे.  त्याची  प्रसिद्धी मिळवायची, प्रत्यक्षात प्रश्न मात्र जैसे-थे ठेवायचे,हीच त्यांची राजकीय पद्धत राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक  सात-आठ महिन्यांवर आल्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या रेडझोनसह अन्य प्रश्नांवर लोकांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महापालिकेत खाबुगिरी असेल, तर चारवेळा नगरसेवक राहिलेल्या  बारणे यांनी त्याचे पुरावे द्यायला कोणी अडविले आहे. मोघम आरोप करून आपण खरोखरचफोटोवाला खासदारअसल्याचे ते स्वतःहून जनतेसमोर सिद्ध करत आहेत. या फोटोवाल्या खासदाराला ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव भागातून महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणता आले आहेत. 

खासदार झाल्यानंतर त्यांनी केवढी मोठी राजकीय उंची गाठली आहे, हे यावरून स्पष्ट होते. याच राजकीय कतृत्वाच्या जोरावर आपण 2019 ला पुन्हा खासदार होण्याची वल्गना त्यांनी जरूर कराव्यात. परंतु, फोटोवाला खासदारहवा की दिल्लीतील प्रश्न सोडवणारा खासदार हवा, हे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेला आता  कळून चुकले आहे, अशी बोचरी टीका आ. जगताप यांनी केली आहे.