होमपेज › Pune › जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बनतेय वाहनतळ..!

जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बनतेय वाहनतळ..!

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 10:36PMपुणे : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयाची भव्य अशी इमारत बांधण्यात आली. त्यामध्ये सुमारे आठ हजार 229 चौरस मीटर क्षेत्रावर वाहनतळासाठी चार मजली स्वतंत्र इमारत उभारली. असे असताना कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला दररोज वाहनतळाचे स्वरुप येत आहे. तर कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या बंडगार्डन पोलिस ठाण्यास समोरील परिस्थिती काही यापेक्षा वेगळी नाही. याकडे प्रशासनासह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची 130 वर्षांची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी सुमारे 75 ते 80 कोटी रुपये खर्चून सुसज्ज पाच मजली इमारत उभारण्यात आली.  मुख्य इमारतीमध्ये तळमजला आणि अन्य पाच मजले असून, एकूण 10 हजार 215 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे. तर 8 हजार 229 चौरस मीटर जागेवर वाहनतळ बनविण्यात आले. त्यामध्ये एकाच वेळी 227 चारचाकी,1 हजार 137 दुचाकी, तर 310 सायकली पार्क करता येऊ शकतात.  मात्र, अनेक वाहन चालक हे पार्किंगपर्यंत जाण्याची तसदी न घेता इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहने उभी करतात.

कार्यालयामध्ये वाहनांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातो. हे प्रवेशद्वार विविध कारणांनी अनेकवेळा बंद ठेवले जाते आहे.  त्यामुळे वाहनधारक हेे जागा मिळेल त्याठिकाणी आपली वाहने उभी करत आहेत. या वाहनांचा अडथळा उपोषण आणि आंदोलन करणार्‍यांना होतो.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्येच बंडगार्डन पोलिस ठाणे असून, हमरस्त्यावरच मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करणार्‍या शहर वाहतूक विभागाला जिल्हाधिकारी कार्यालय, बंंडगार्डन पोलिस ठाण्यासमोरील बेकायदा पार्क केलेली वाहनेे दिसत नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सुरक्षा रक्षकांचेही मौन..

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वावरील सुरक्षा रक्षक येणार्‍यांची सर्व माहिती नोंदवतात. मात्र, मुख्य प्रवेशद्वारासमोर उभ्या केल्या जात असलेल्या वाहनांबाबत त्यांचे तोंडावर बोट अन् हाताची घडी असते. 

नो पार्किंग फलकच नाही

शहरामध्ये ज्या ठिकाणी नो पार्किंग किंवा एकतर्फी वाहतुकीसाठी मार्ग असेल त्याची माहिती वाहनचालकांना झाली पाहिजे. यासाठी दिशादर्शक व माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये 8 हजार 229 चौरस मीटर जागेवर वाहनतळ बनविण्यात आले. त्यामुळे इमारतीबाहेर नो पार्किंगचे फलक लावणेे आवश्यक  असताना तसा फलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिसून येत नाही.