‘सारथी’कडून विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जमा

Last Updated: Feb 19 2020 1:40AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा 
‘सारथी’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन अखेर मंगळवारी त्यांच्या खात्यावर जमा केले. राज्यातील सुमारे 225 विद्यार्थ्यांचे जानेवारी महिन्याचे विद्यावेतन थकले होते. थकित विद्यावेतनामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 

मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत दिल्ली येथील प्रतिष्ठित प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीमध्ये युपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी निवड प्रक्रिया राबवून 225 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे क्लासेसच्या शुल्कासह दर महिना 13 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून संस्थेच्या कारभाराबाबत सुरु असलेल्या वादामुळे संस्थेचे काम ठप्प पडले होते. त्यामुळे संस्थेद्वारे दिल्ली येथे युपीएससीची तयारी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे जानेवारी महिन्याचे विद्यावेतन थकले होते. विद्यावेतन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिल्ली येथे राहणे मुश्कील झाले होते. याबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर वर आंदोलन करत तात्काळ विद्यावेतन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार संस्थेद्वारे मंगळवारी कर्मचार्‍यांच्या वेतनाची रक्कम वळवत विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जमा केले. आतापर्यंत सुमारे दिडशे विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जमा करण्यात आले असून, उर्वरित विद्यार्थ्यांचे विद्यावेतन क्लासेसमध्ये उपस्थित राहिल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जमा करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकिय संचालक आनंद रायते यांनी दिली. 

10 कोटी 13 लाख रुपये खर्चास मान्यता 
‘सारथी’साठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या एकूण निधीपैकी 10 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. अर्थसंकल्पात संस्थेसाठी 38 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी एप्रिल ते जुलै महिन्याचा 12 कोटी 66 लाख एवढा निधी वितरीत करण्यात आला होता. तर उर्वरित 10 कोटी 13 लाख रुपये वितरित करण्याच्या निर्णयास ओबीसी विभागाने घेतलेल्या आक्षेपामुळे रद्द करण्यात आला होता. दरम्यान, ओबीसी विभागाने आता निधी वितरीत करण्यास केलेल्या विनंतीनुसार 10 कोटी 13 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात येत असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. 

शासनाने मंजूर केलेला निधी लवकरच सारखी संस्थेच्या खात्यावर जमा होईल. त्यानंतर संस्थेद्वारे सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत एमपीएससी, एमफील, पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, तसेच तारादूतांचे मानधन आदी सोमवार पर्यंत जमा देण्यात येईल.
- आनंद रायते,  व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे.