होमपेज › Pune › ई-मॅमलच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात

ई-मॅमलच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 8:29PMचिपळूण  : वार्ताहर

वन्यजीवांची माहिती संकलित करून तिच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या ‘ई-मॅमल’ प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याला येथील सह्याद्री निसर्ग मित्र, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)च्या सहकार्याने प्रारंभ झाला आहे. यामध्ये पश्‍चिम घाट आणि कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 7 जिल्ह्यांतील 20 शाळांचा समावेश आहे. या निमित्ताने ट्रॅप कॅमेेर्‍यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून वन्यजीवांचा शोध घेतला जात आहे.

सिटीझन सायन्समधील एक प्रकल्प म्हणजेच ई-मॅमल प्रकल्प होय. हे एकप्रकारे सायबर टूल असून कॅमेरा ट्रॅपिंग प्रतिमा आणि माहिती एकत्रित करणे, संग्रह करणे आणि सामायिक करणे यासाठी ही एक वन्यजीवांबाबत माहिती व्यवस्थापन सिस्टीम आहे. हा प्रकल्प 17 देशांत राबविण्यात येत असून भारतात प्रथमच राबविला जात आहे. वन्यजीवाबाबत माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे. देशात सह्याद्री भाग हा जैवविविधतासंपन्न आहे. बी.एन.एच.एस.ने 2015 साली ई-मॅमल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्गातील आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कूलसह जय सेवा आदर्श हायस्कूल, पवनी, नागपूर व एसजिएम भडांगे हायस्कूल, वाकी, पालघर या शाळांत हा प्रकल्प राबवत यशस्वीरित्या पहिला टप्पा पूर्ण केला.

या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात निवडलेल्या 20 मधील प्रत्येक शाळेला 3 ट्रप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी व मेमरी कार्डस् आणि माहितीपत्रिका प्रदान केल्या आहेत. विद्यार्थी 5 ते 10चा गट तयार करून कॅमेरे शाळेच्या आजुबाजूच्या परिसरात बसवतात व त्यामध्ये आलेले फोटो विद्यार्थी स्वतः ई-मॅमल वेबसाईटवर अपलोड करतात. यावेळी एसएनएमचे प्रकल्प अधिकारी प्रसाद गोंड, सागर रेडीज, अनिकेत देसाई व राजेंद्र हुमारे हे या प्रकल्पाचे परीक्षण करीत विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्य करीत आहेत.

मागील वर्षभरात ट्रप कॅमेरे विद्यार्थ्यांद्वारे लावण्यात आले असून त्यामध्ये आलेली छायाचित्रे ई-मॅमल वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत. ही शास्त्रीय माहिती संशोधनासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक संशोधकांचा बराच पैसा व वेळ वाचत आहे. आतापर्यंत या  कॅमेर्‍यांमध्ये पट्टेरी वाघ, अस्वल आणि बिबट्या तसेच दुर्मीळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे खवलेमांजर त्याचप्रमाणे साळींदर आणि सहज आढळणारे भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळेमांजर, मुंगूस व माकडे आदी वन्यप्राणी टिपले गेले आहेत.

पावसाळ्यात कॅमेरे लावणे शक्य होत नसल्याने प्रकल्पांतर्गत सर्व शाळांत चित्रकला, निबंध, प्रश्‍नमंजूषा, सर्प जनजागृती आदी उपक्रम राबविले. वन्यजीवांवर आधारित माहितीपट दाखविले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या वन्यजीवांबाबत ज्ञान मिळविणे शक्य झाले व त्यांच्यामध्ये उत्साह व जिज्ञासा निर्माण झाली. ई-मॅमल प्रकल्पामुळे प्रगत तंत्रज्ञानाचा प्रथम अनुभव घेणारे विद्यार्थी  अत्यंत उत्साहात सहभागी होत आहेत.