होमपेज › Pune › शिवसेनेला भाजपचे ‘जशास तसे उत्तर’

शिवसेनेला भाजपचे ‘जशास तसे उत्तर’

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 10:38PMपिंपरी : संजय शिंदे

शिवसेनेचे खा.श्रीरंग बारणे यांनी क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन भाजपच्या लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करून या कार्यक्रमाच्या आडून  आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर कडी केली होती. त्यानुषंगाने शहर भाजपच्या वतीने चापेकर स्मारक समितीला बरोबर घेऊन महापालिकेच्यावतीने चापेकर स्मारकाच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामांतर्गत चार मजली इमारतीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेऊन भाजपने शिवसेनेच्या कार्यक्रमाला जशास तसे उत्तर देण्याचा चंग बांदला आहे.

सोमवारी (दि.23) भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणार्‍या वादमुखवाडी येथील गृहप्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबरोबरच चिंचवड येथील चापेकर स्मारक समिती आणि महापालिका यांच्यावतीने चापेकर स्मारकाच्या दुसर्‍या टप्प्यात चार मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होत असला तरी यामागे येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. 

चापेकर स्मारक समितीला बरोबर घेवून खासदार बारणे यांनी रविवारी (दि.8) लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याहस्ते क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील परंपरागत भाजप प्रेमींच्या मतदारसंघात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता.  बारणे यांची ही चाल भाजपचे शहराध्यक्ष आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रबळ दावेदार आमदार जगताप यांच्या वर्मी लागल्याची जोरदार चर्चा आहे. त्याअनुषंगाने तेवढाच भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांकडून प्रयत्न सुरू होते. त्याला सोमवारी मूर्त रूप प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यासाठी शहराध्यक्ष आणि त्यांची टीम कामाला लागल्याची चर्चा आहे.तर तिकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाबरोबर वडमुखवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेतून साकारणार्‍या गृहप्रकल्पा च्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना कार्यक्रमाला बोलावून करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या वतीने निवडणुकीपूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी लगबग सुरू आहे.