Tue, Jul 23, 2019 07:09होमपेज › Pune › पालिका सभेत संगीत वस्त्रहरण

पालिका सभेत संगीत वस्त्रहरण

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी काम होत नसल्याची व्यथा व्यक्त करीत, पक्षाला घरचा आहेर दिला. विरोधकांनीही त्यांना साथ देत, भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. कर्मचार्‍यांच्या मारहाणीच्या प्रकरणावरूनही सभागृह नेते आणि काँग्रेसच्या गटनेत्यांमधील शाब्दिक चकमक टोकाला गेली. हे प्रकरण हमरातुमरीवर गेले. त्यातच तोल सुटलेल्या सभागृह नेत्यांनी काँग्रेसच्या गटनेत्यांवर इथेच्छ आरोप करून, चांगलीच खळबळ उडविली. त्यामुळे मुख्य सभेत संगीत वस्त्रहरणचा प्रयोग रंगल्याचेच यानिमित्ताने पाहायला मिळाले.

कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकच झालेत हतबल

सत्ता असून कामे होत नसल्याने सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी मुख्य सभेत अक्षरशः हतबलता व्यक्त केली. पाणी प्रश्‍नावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे यांनी तर थेट राजीनाम्याचा पवित्रा घेतला. तर आम्ही सभागृहात काय केवळ मतदानाला हात वर करण्यासाठी येतो का, अशा शब्दात नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नाराजी व्यक्त केली. 
महापालिकेच्या मुख्य सभेत बालवडकर यांनी त्यांच्या समस्यांचाच पाढा वाचला. ते म्हणाले, पाणी, शाळा, कचरा, स्पीड ब्रेकर या महत्त्वाच्या प्रश्‍नासंदर्भात प्रशासनाला आतापर्यंत तब्बल चाळीस पत्रे दिली. मात्र, त्यामधील एकाही पत्राची साधी दखलही घेतलेली नाही. ‘सभागृह नेते, येथे नगरसेवक असून आमचीच कामे होत नाहीत, याला जबाबदार कोण,’ असा प्रश्‍न त्यांनी सभागृह नेत्यांना उद्देशून केला. बालवडकरांकडूनच थेट सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर मिळत असल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बाके वाजवून त्यांना दाद दिली. त्यावर बालवडकर यांनी विरोधकांना उद्देशून ‘बाके 
वाजवू नका, तुमचीही अशीच अवस्था आहे’ या शब्दात आपला राग व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षात असताना नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात आंदोलने करता येत होती, ते कामेही करायचे आता मात्र सत्तेत असल्याने आंदोलनेही करता येत नाही, या शब्दात त्यांनी महापौरांकडे खंत व्यक्त केली.तर लोहगाव परिसराला पाणी पुरवठ्याच्या मुद्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर न आल्याने नगरसेवक कर्णे गुरुजी यांनी थेट राजीनामा अस्त्र उपसले. या प्रशासनाच्या दाव्यानुसार परिसराला पाच ते सहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचे सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ, या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.सत्ताधारी नगरसेवकांची ही अवस्था असेल तर आमचे काय, असा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याचा आरोप केला. तर, नगरसेवक चांदेरे यांनीही बालवडकर यांच्या मदतीला धावत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला.

कर्मचार्‍यांना मारहाणीवरून नगरसेवकांमध्येच चकमक 

अतिक्रमण निरीक्षकाला कार्यालयात जाऊन मारहाण करण्याच्या घटनेचे पडसाद सोमवारी मुख्य सभेत उमटले. संबंधितांवर प्रशासनाने काय कारवाई केली, असा प्रश्‍न काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी लावून धरला. तर या कर्मचार्‍याने पैशांची मागणी केल्यानेच त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचा पवित्रा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी घेतला. त्यावर शिंदे आणि भिमाले यांच्यात जोरदार शब्दिक चकमक उडून, हे प्रकरण हमरातुरीवर जाण्याचा प्रकार सभागृहात घडला.

मार्केट यार्ड येथे हॉटेलच्या अतिक्रमणावर कारवाई केल्याने, अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण करण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यावर शिंदे यांनी मारहाण करून कर्मचार्‍यांना खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार गंभीर आहे. अशा घटनांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत निर्माण होऊन, त्यांचे मनोधैर्य खचेल. त्यावर प्रशासनाने नक्की काय कारवाई केली, असा प्रश्‍न उपस्थित करून मारहाण करणारा एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याचा कार्यकर्ता असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यावर नगरसेवक अविनाश बागवे, संजय भोसले, बाळा ओसवाल यांनीही संबधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली. 

ही चर्चा सुरू असतानाच मारहाण झालेल्या कर्मचार्‍याने पैशाची मागणी केली होती. याच कारणास्तव चार महिन्यांपुर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, असे सभागृह नेते भिमाले यांनी सांगितले. त्यावरून शिंदे यांनी कर्मचार्‍यांची बाजू घेण्याऐवजी मारहाण करणार्‍यांची बाजू घेणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावरून शिंदे आणि भिमाले यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यातच भिमाले यांचा तोल सुटला आणि त्यांनी शिंदे यांच्यावर बेछूट आरोपांचा माराच सुरू केला. या प्रकाराने सगळेच अवाक झाले. प्रकरण हमरातुमरीवर गेल्याने सभागृहात गोंधळांचे वातावरण निर्माण झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी भिमाले यांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी शिंदे यांना शांत बसण्याची विनंती केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि या वादावर पडदा पडला.