Wed, May 22, 2019 22:48होमपेज › Pune › पिंपरी उड्डाणपुलाखालील वाहनतळ बंद 

पिंपरी उड्डाणपुलाखालील वाहनतळ बंद 

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:10AM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी रेल्वे उड्डाणपुलाखाली मॉलजवळ असलेला वाहनतळ बंद असल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत, यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. याबाबत माहिती घेतली असता यापूर्वीचे पार्किंग  अनधिकृत होते; मात्र आता नियोजन करून पालिका तेथे मेट्रो व ‘बीआरटी’साठी एकत्रित पार्किंग व्यवस्थेच्या तयारीत असल्याचे समजले; मात्र हे कागदी घोडे किती दिवस नाचवत बसणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

पिंपरी कॅम्प ही शहरातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.  पिंपरी रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वाहनतळ ही काळाची गरज आहे, हे ओळखून  पुलाखाली पालिकेने वाहनतळासाठी आरक्षण ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे वाहनांचे पार्किंग केले जात होते; मात्र आता अचानक पालिकेने पार्किंगच्या गेटला टाळे ठोकल्याने लोकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागत आहेत. 

याबाबत पालिकेच्या भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रशासन अधिकारी जाधवर यांना विचारले असता त्यांनी मी नवीन आलो आहे, माहिती घेतो, असे सांगितले. 

‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांनी सांगितले की, पुलाखालील जागेत पार्किंगचे आरक्षण आहे. पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता यावी यासाठी प्रभागाच्या वतीने ‘बीआरटी’, मेट्रोला पत्रे पाठवली आहेत. त्यांच्या पार्किंगच्या नियोजनाबाबत अवगत करावे, असे त्यांना सांगितले आहे.