Mon, Mar 25, 2019 03:28
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

शहरात सलग दोन दिवसांपासून  पडणार्‍या संततधार पावसामुळे खडकवासला धरण ओसंडून वाहत आहे.  सोमवारी (दि. 16) सायंकाळी पाचच्या सुमारास धरणातून 14 हजार क्युसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. परिणामी मुठा नदीतील पाण्यासाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्रातून शहराला जोडणार्‍या बाबा भिडे पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी दुपारी तीन वाजल्यानंतर भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतूक विभागाने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले असून डेक्कन वाहतूक विभागाचे आठ कर्मचारी आणि तीन अधिकारी तसेच विश्रामबाग वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे महानगरपालिका आणि वाहतूक विभाग, अग्निशामक विभागाच्यावतीने खबरदारी घेण्यात आली आहे. नागरिकांना परिसरात जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. 

डेक्कन परिसरातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकांकडून भिडे पुलाचा वापर केला जातो. दरम्यान, पुलाची उंची कमी असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून भिडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. मागील वर्षी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीपात्रात पार्किंग करण्यात आलेली  चारचाकी वाहने बुडाली होती. त्यापार्श्‍वभुमीवर प्रशासनाच्यावतीने यावर्षी खबरदारी घेतली असून पुल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.