Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Pune › राज्यात ७८ कारखान्यांची धुराडी बंद

राज्यात ७८ कारखान्यांची धुराडी बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात चालू वर्षीच्या ऊस गाळप हंगामात सुमारे 100 लाख टन साखरेचे उत्पादन तयार झाले आहे. सुमारे 900 लाख टन ऊस गाळपातून सरासरी 11.15 टक्के उतार्‍यानुसार हे साखर उत्पादन हाती आले असून, 187 पैकी 78 साखर कारखान्यांची धुराडी ऊस संपल्याने बंद झाली आहेत. हंगामाच्या सुरुवातीला 73.40 लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज होता. त्यापेक्षा अधिक उत्पादन आत्ताच हाती आल्याने हंगामअखेरीस सर्व स्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

ऊस गाळप हंगाम 2017-18 च्या धोरणासाठी सप्टेंबर महिन्यात मंत्री समितीची बैठक झाली होती. त्यावेळी राज्यात सुमारे नऊ लाख हेक्टरवरील क्षेत्रातून एकूण ऊस उपलब्धता 722 लाख टन राहण्याचा आणि त्यापैकी प्रत्यक्ष गाळपासाठी 650 लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. तर 11.30 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 73.40 लाख टन साखर उत्पादन होईल, असे अपेक्षित धरण्यात आले होते. साखर आयुक्तालयाचे हे सर्व अंदाज फोल ठरले असून, विक्रमी ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे. 

राज्यात हंगाम 2014-15 मध्ये 930 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 11.30 टक्के उतार्‍यानुसार सर्वाधिक म्हणजे 105 लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन तयार झाले होते. हा विक्रम यंदाच्या वर्षी मोडीत निघण्याची अपेक्षा असून, साखर आयुक्तालयाच्या सुधारित अंदाजानुसार 980 लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे. त्यानुसार अद्यापही 80 लाख टन ऊस गाळप होणे बाकी आहे. त्यामुळे यापूर्वीच्या साखर उत्पादनापेक्षा अधिक साखर उत्पादन अपेक्षित आहे.

यंदा कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक म्हणजे 12.39 टक्के इतका हाती आला आहे. तर ऊस गाळप आणि साखर उत्पादनात पुणे विभागाची आघाडी कायम आहे. पुणे विभागात 356.27 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर सरासरी 11.06 टक्के उतार्‍यानुसार 394.10 लाख क्विंटल साखर उत्पादन हाती आले आहे. 

 

Tags : pune, pune news, sugar factories, Close 


  •