होमपेज › Pune › सफाई कामगारांची पिळवणूक

सफाई कामगारांची पिळवणूक

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 11 2018 10:52PMपिंपरी : प्रतिनिधी

सफाई कामगारांना ठेकेदारांनी तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्याविरोधात सफाई कामगार महिलांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. शनिवारी (दि.11) सकाळी 7 वाजता कामावर हजेरी लावून, सुमारे 100 महिला कामगारांनी आमदार महेश लांडगे व आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या दारातच ठिय्या मांडला. या वेळी आमदार लांडगे आणि अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांनी दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्‍वासन देऊन त्यांची बोळवण केल्याने कामगारांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. 

शहरातील सर्व ठेकेदार सफाई कामगारांची पिळवणूक करत आहेत. सफाई कामगारांचे एटीएम व पासबुकही ठेकेदारांनी आपल्याकडेच ठेवले आहे. कामगारांना नियमांनुसार पगार न देता सुमारे सात हजार रुपयेच दिले जात आहेत. उर्वरित पगारावर ठेकेदार डल्‍ला मारत आहेत. कामगारांना केवळ आश्‍वासनावरच समाधान मानावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही पगार होत नसल्यामुळे सफाई कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. 

शनिवारी सकाळी 7 वाजताच आमदार महेश लांडगे यांच्या घरासमोर महिलांनी ठिय्या दिला. बराच वेळ आमदार लांडगे यांनी त्यांची दखल घेतली नाही. तासाभरानंतर त्यांनी दोन दिवसांत पगार देण्याचे आश्‍वासन दिले; मात्र महिलांनी यावर नाराजी दर्शवली. त्यानंतर या कामगारांनी आयुक्‍त बंगल्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.याबाबत तिरुपती इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता, पाच महिन्यांपासून महापालिकेकडून येणारे पैसे थकले आहेत. जानेवारी व फेब्रुवारीचाच केवळ पगार दिला आहे. आरोग्य अधिकार्‍यांना संपर्क साधला आहे. त्यांनी दिल्यानंतर आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले..

आंदोलनाला शहरातील संघटनांचा पाठिंबा

सफाई महिला कामगारांनी कोणत्याही नेतृत्वाशिवाय आंदोलन केले. या वेळी सुमारे 100 महिला या आंदोलनांमध्ये सहभागी होत्या. त्यांच्या आंदोलनाला शहरातील इतर संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. यामध्ये कष्टकरी कामगार पंचायत, कागद-काच-पत्रा वेचक संघटना, कॉन्ट्रक्टर असोसिएशन आदींचा समावेश होता.