Fri, Jul 19, 2019 18:44होमपेज › Pune › कॅन्टोन्मेंट परिसरात स्वच्छतेचा बोजवारा 

कॅन्टोन्मेंट परिसरात स्वच्छतेचा बोजवारा 

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 10:54PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दिवसेंदिवस कचरा समस्या सुटण्याऐवजी आणखी जटील होत चालली आहे. बोर्डाकडे कायम नोकरीतील सफाई कर्मचार्‍यांची संख्या मागील काही वर्षात रोडावत चालली आहे. त्यामुळे बोर्डाने लष्करी भागाचा अपवाद सोडल्यास सातही वॉर्डात सफाईचा ठेका खासगी संस्थेला दिला. मात्र, मागील एक वर्षाच्या काळात संबंधित ठेकेदाराकडून कामचुकारपणा होत असल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने कचर्‍याचा प्रश्‍न पुन्हा एकदा धुमसू लागला आहे. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या मागील दोन दशकांत सुमारे दिडपटीने वाढली आहे. या बदलानुरूप बोर्डाच्या सेवा व कर्मचारी संख्येत बदल मात्र, होऊ शकले नाहीत. त्यामुळे काळानुरूप सर्वच विभागात कर्मचारी संख्या घटत गेली. याचा सर्वाधिक फटका सफाई व आरोग्य विभागाला बसला आहे. सुरूवातीच्या काळात बोर्डाकडे सफाई कर्मचार्‍यांची 210 पदे मंजुर होती. सद्यस्थितीत ती निदान साडेतीनशे असायला हवीत. मात्र, वेळच्यावेळी आढावा घेतला न गेल्याने हि संख्यावाढ झाली नाहीच शिवाय आहे ती मंजुर संख्याही टिकवता आली नाही. आजमितीस बोर्डाकडे अवघे 80-85 सफाई कर्मचारी आहेत. यातील जवळपास 60 कर्मचारी लष्करी भागात काम करतात. उर्वरित कर्मचार्‍यांना रुग्णालय, पाणी टँकर, मैलागाडी आदी ठिकाणी सेवेत ठेवण्यात आले आहे. 

सातही वॉर्डात मनुष्यबळाच्या अभाव असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरातील सफाईचे काम खासगी संस्थेमार्फत केले जात आहे. सातही वॉर्डातील सफाई, गोळा झालेला कचरा उचलणे, वाहुन नेणे व कचरा डेपोत टाकणे आदी सर्व कामांचा यात अंतर्भाव आहे. या कामासाठी दरमहा सुमारे 39 लाख रूपये मोजावे लागतात. दुसरीकडे बोर्डाच्या हद्दीतून दररोज उचलला जाणार्‍या कचर्‍याचे प्रमाण जवळपास सात टन असल्याचे सांगण्यात येते. सातही वॉर्डातील सफाई तसेच कचरा वाहुन नेणे, कचरा उचलणे आदी कामांसाठी एकूण 175 कर्मचारी, कचरा वाहतुक करणारी वाहने (ट्रॅक्टर व ट्रॉली) तसेच जेटींग यंत्रे आदीं बाबींची पूर्तता ठेकेदाराकडून अपेक्षित आहे.

मात्र, मागील वर्षीचा आढावा घेतल्यास या कामात अनेक त्रुटी आढळुन आल्या आहेत. चालु वर्षात कचरा डेपोत कचर्‍याच्या ढिगार्‍यांना आगी लागण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. ठेकेदाराला वारंवार सांगुनही कचरा वाहतुकीत सुधारणा होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्ट आदेश असूनही उघड्या वाहनातून कचरा वाहुन नेला जातो. कर्मचारी संख्या अपूरी असल्याचे वारंवार समोर आले आहे. बोर्डाच्या विद्यमान सदस्या ओड अरूणा पिंजण यांनी अनेकवेळा हा मुद्दा निदर्शनास आणला आहे. एकंदरीतच शहरातील स्वच्छतेवर शहरातील नागरिकांचे आरोग्य अवलंबुन आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न प्राथमिकतेने व प्रभावीपणे हाताळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. उलट या यंत्रणेचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे.