Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Pune › सफाई कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात

सफाई कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 10:58PMपिंपरी : प्रतिनिधी

सफाई कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने पुरविण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कर्मचार्‍यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. दरम्यान अनुसूचित जाती आयोग व राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानेही या बाबत खुलासा मागितला होता. आयोगाच्या पत्रानंतरही महापालिका प्रशासन कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत अनेक सफाई कर्मचारी काम करत आहेत. या सफाई कर्मचार्‍यांना शहरातील नाले सफाई व ड्रेनेजची कामेही करावी लागत आहेत. ही कामे करताना त्यांना सुरक्षा साधने पुरविणे बंधनकारक आहे. यामध्ये मास्क, शुज, हँण्डग्लोज, रेनकोट, युनिफॉर्म आदीसह विविध सुरक्षा साधनांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाला सफाई कर्मचार्‍यांविषयी अनास्था असल्याचे चित्र आहे. सध्या सफाई कर्मचार्‍यांकडून नाले सफाईची कामे करवून घेतली जात आहेत. ही नाले सफाई करताना त्यांना कोणतीच सुरक्षा साधने पुरवली जात नाहीत. या सफाई कर्मचार्‍यांनी आम्हाला सुरक्षा साधने द्यावीत, यासाठी संबंधीत अधिकार्‍यांकडेही मागणीही केली आहे. तरीही त्यांच्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. 

या बाबत आरोग्य विभागाच्या तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय कर्मचारी सफाई आयोगाकडे तक्रार केली. आयोगाच्या वतीने सफाई कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने पुरविण्यासाठी महापालिका आयुक्‍तांना पत्राद्वारे सुचना दिल्या. या बरोबरच सुरक्षा साधने का पुरवली जात नाहीत या बाबत अहवाल देण्याची सुचना केली आहे; मात्र महापालिका प्रशासनाने या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात घालणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.