होमपेज › Pune › १९ हजार नागरिकांच्या मोबाईलमध्ये ‘स्वच्छता अ‍ॅप’

१९ हजार नागरिकांच्या मोबाईलमध्ये ‘स्वच्छता अ‍ॅप’

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:14AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका जोमाने तयारी करीत असून, आतापर्यंत तब्बल 10 हजार 70 नागरिकांनी केंद्राचे ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड केले आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

स्वच्छ शहर स्पर्धेत नागरिकांच्या मोबाईलमध्ये ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करून घेण्याची अट आहे. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 35 हजार नागरिकांनी सदर अ‍ॅप डाऊनलोड करायचे आहे. त्या दृष्टीने महापालिका उपाययोजना करीत आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, महाविद्यालयीन विद्यार्थी, पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घेत आहेत. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल 19 हजार 70 जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

त्यामध्ये 2 हजार 644 अ‍ॅक्टिव्ह युजर असून, 16 हजार 426 नॉ अ‍ॅक्टिव्ह युजर आहेत. नागरिकांच्या या माध्यमातून एकूण 3 हजार 78 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील 2 हजार 394 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. 83 तक्रारींवर कामकाज सुरू असून, 601 तक्रारींचे निराकरण करणे बाकी आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रार केल्यास त्याचे 12 तासांच्या आता निराकरण केले जाते, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. अ‍ॅपद्वारे नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार स्पर्धेत 400 गुण दिले जाणार आहेत. 

स्वच्छतेसह विविध तक्रारींसाठी महापालिकेच्या अ‍ॅप, सारथी हेल्पलाईन आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आहे. त्यासह केंद्राच्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारी केल्यास त्याचे महापालिकेच्या वतीने निराकरण केले जाते; मात्र स्वच्छता अ‍ॅप हे अधिक सुलभ आणि सुटसुटीत असल्याने ते वापरण्यास सोपे आहे. हे अ‍ॅप केवळ स्पर्धेपुरते डाऊनलोड करण्याची सक्ती नसून, इतर वेळेत त्यावर महापालिकेकडून प्रतिसाद दिला जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.