Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Pune › शासनाकडून सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा : बापट 

शासनाकडून सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा : बापट 

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाकडून पुण्यात सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ असा विशेष दर्जा देण्यात आला आहे. ग्राहकाला स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य शासनाने असा विशेष दर्जा दिला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली.

जागतिक अन्न सुरक्षितता दिनानानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात सारसबागेबरोबरच जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी आणि नागपूर फुटाळा तलाव येथील खाऊ गल्लीलाही ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ, चविष्ट आणि अधिक दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि ‘एफ. एस. एस. आय.’चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर, अन्न व औषध प्रशासन सचिव संजय देशमुख, ‘गेन’ या संस्थेचे भारतातील प्रमुख तरूण वीज आणि ‘एएफएसटीआय’ चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे व इतर वरिष्ठ अधिकारी, विविध अन्न खाद्यपदार्थ व्यावसायिक व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दोन मोबाईल फूड टेस्टींग लॅबसाठी केंद्राकडून राज्याला 10 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. असे सांगून बापट पुढे म्हणाले की, स्वच्छता बाळगणार्‍या उपहारगृहांना हायजीन रेटिंग आणि फूड फोर्टीफिकेशन लवकरच दिले जाणार आहे.

प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यासाठी विक्रेत्यांना विश्‍वासात घेऊन जनजनजागृती करण्याची एक मोहीम शासनाने आखली आहे. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह आहे.

दूध, आटा, मैदा, मीठ, खाद्यतेल, इ.मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोह याचे फूड फोर्टिफिकेशन करण्याचे काम राज्याने उत्तम प्रकारे केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यांची माहिती आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन व ऑनलाईन प्रणालीचा शुभांरभ बापट यांच्या हस्ते झाला. तसेच पौष्टिक आहार उपक्रमातील पिंक बुक व येलो बुक याचे उद्घाटनही त्यांनी केले. स्वच्छतेचे निकष पाळणार्‍या 30 उपहारगृहांना बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील 10 उपहारगृहांचा समावेश आहे.