Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Pune › पुणे मराठी ग्रंथालय बुडाले हास्यरंगात

पुणे मराठी ग्रंथालय बुडाले हास्यरंगात

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

पुण्याचा प्रसिद्ध गणेश उत्सव उर्फ ‘पुणे फेस्टिवल’मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी नऊवारी साडी परिधान करून आली खरी; मात्र, तिच्या इच्छेप्रमाणे साडीला ‘मॅचींग’ ब्लाऊज अवघ्या तीन तासात कसा शिवून आणला गेला, याचा किस्सा डॉ. सतिश देसाई सांगताच पुणे मराठी ग्रंथालयाचे केशव सभागृह  हास्यरंगात अक्षरश: बुडून गेले..आपल्या चार दशकांच्या वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीत भेटलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या अनुभवातून मिळालेले धडे आणि संस्कार आदींचा पट ‘हास्यरंग’ कार्यक्रमातून डॉ. देसाई खुमासदार शैलीतून उलगडत नेला.त्यांच्या जीवनप्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांचे किस्से याचा खूप मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. तो ‘रूपाली’च्या कट्यावर सांगण्यापुरता किंवा मित्र परिवारापुरता न ठेवता दोन-चारशे श्रोत्यांसमवेत ‘शेअर’ करावा, या हेतूने डॉ. देसाई ‘आनंदयात्री’ कार्यक्रम सादर करतात आणि प्रत्येकवेळी त्यात बदलही होत जातात. असाच एक कार्यक्रम ‘दै.पुढारी’तर्फे साहित्य सेतू आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सादर करण्यात आला.

डॉ. देसाई यांनी या कार्यक्रमाचे नाव ‘हेमामालिनीचा ब्लाऊज आणि मी’ असे ठेवण्याचे मनात होते, अशी सुरुवात करताच सभागृहात हास्यकल्लोळ उसळला आणि पाठोपाठ एकामागून एक किस्से सांगत डॉ. देसाई यांनी ब्लाऊजच्या किस्स्याची उत्सुकता वाढवत नेऊन मग तो सविस्तर निवेदन केला. मंडईमधील शेखर खन्ना या कार्यकर्त्यांचा किस्सा.. निवडणुकीचे किस्से.. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतानाचे किस्से.. दीर्घ प्रतीक्षा यादी असताना अवघ्या तासाभरात टेलिफोन कसा मिळाला याचा किस्सा... एका दैनिकामधील फोटोमध्ये नगरसेविकेसोबत विचित्र पोजमध्ये झळकल्यानंतर उडालेल्या तारांबळीचा किस्सा.. डॉ. सतीश देसाई यांनी सादरीकरणाद्वारे मांडलेल्या अशा विविध किश्श्यांनी पुणे मराठी ग्रंथालयाचे सभागृह हशांनी खळाळले. निमित्त होते ‘दै. पुढारी’तर्फे साहित्य सेतू आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंदयात्री’ कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात डॉ. सतीश देसाई यांनी त्यांच्या राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात घडलेले विविध किस्से उपस्थितांसमोर सांगितले.

यावेळी पुणे मराठी ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा डॉ. अनुजा कुलकर्णी, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, दिलीप ठकार, साहित्य सेतूचे क्षितिज पाटुकले उपस्थित होते. कार्यक्रमात ‘दै.पुढारी’तर्फे डॉ. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. देसाई म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रसंग घडत असतो. एखादा मित्र भेटतो, नातेवाईक भेटतो. असे असंख्य व्यक्ती आपल्याला भेटतात. मात्र, प्रत्येकच व्यक्ती आपल्याला लक्षात राहत नाही. आयुष्यामध्ये विविध व्यक्ती येत असतात. चांगली माणसे आयुष्यात आली तर जगण्याचा अर्थ कळतो. आयुष्यातील किस्यांमुळे मी घडत गेलो. वर्षानुवर्षे काम करण्याची क्रेडीबिलिटी मला अनुभवातून अनुभवता आली. आयुष्यात येणार्‍या लोकांमुळे आपले आयुष्य समृद्ध होत असते.

प्रास्ताविक करताना प्रतिभा पटवर्धन म्हणाल्या, पुणे मराठी ग्रंथालय शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ग्रंथालयाची ग्रंथ संपदा दोन लाखांवर आहे. वेग-वेगळे विभाग असून अभ्यासिकेला 55 वर्ष पूर्ण झाले आहे. ग्रंथालयात अद्ययावत असा बालविभाग आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ग्रंथालय काम करते आहे. शहरातील विविध परिसरात वाचन केंद्र सुरू केले आहेत. लहान मुलांना वाचनाचा आनंद घेता यावा यासाठी वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. शालेय मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ग्रंथालयातर्फे विविध शाळांमध्ये ग्रंथपेटी योजना राबविल्या जात आहे. ग्रंथालय काळानुसार वेग-वेगळे उपक्रम राबविले जात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा कुलकर्णी यांनी आणि संयोजन मधुरा दाते यांनी केले.