Sun, Jun 16, 2019 02:19होमपेज › Pune › शहर ‘पार्किंग पॉलिसी’ला विरोध

शहर ‘पार्किंग पॉलिसी’ला विरोध

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:41AMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यावर शनिवार (दि.19) होणार्‍या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, या सशुल्क वाहनतळामुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट होणार असून, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातून त्यास कडवा विरोध होऊ लागला आहे. पाणीपट्टी दरवाढीप्रमाणे ही योजनाही शहरवासीयांवर सत्ताधारी भाजप लादणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पार्किंग पॉलिसीनुसार शहराचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’  असे चार विभाग करून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तासांप्रमाणे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ‘अ’ या सर्वांत वर्दळीच्या आणि 80 ते 100 टक्के पार्किंग असलेल्या विभागासाठी सर्वांधिक शुल्क असणार आहे. तर, मध्यम वर्दळीच्या आणि 60 ते 80 टक्के पार्किंग असलेल्या ‘ब’ विभागासाठी त्यापेक्षा थोडा कमी दर आहे. वाहने पार्क करण्याचे प्रमाणे 40 ते 60 टक्के असलेल्या ‘क’ विभागासाठी आणखी कमी शुल्क असेल. सर्वांत कमी म्हणजे 40 टक्के पेक्षा कमी पार्किंग असलेला ‘ड’ विभाग आहे.

त्यानुसार प्रती तासाकरीता ‘अ’ विभागासाठी दुचाकीला 4, ‘ब’साठी 3 व ‘क’ साठी 2 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. रिक्षाला अनुक्रमे 12,9 व 6 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. मोटार व टेम्पोसाठी हा दर अनुक्रमे 12, 9 व 6 रूपये आहे. मीनी बससाठी अनुक्रमे 30, 22 व 15,  ट्रकसाठी 66,48 व 33 आणि खासगी बससाठी 78, 58 व 39 रूपये असे शुल्क भरावे लागणार आहे.  निवासी पार्किंगसाठी दुचाकीला प्रतीदिनी पाच रूपयांप्रमाणे वार्षिक 1 हजार 825 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. रिक्षाला 15 रूपयांप्रमाणे वार्षिक 5 हजार 475 रूपये शुल्क पडणार आहे. मोटार व टेम्पोला प्रतीदिन 25 रूपयांप्रमाणे वर्षाला 9 हजार 125 रूपये शुल्क असणार आहे. मीनी बसला 38 रूपयांप्रमाणे 13 हजार 688, ट्रकला 55 रूपयांप्रमाणे 20 हजार 75 आणि खासगी बसला 98 रूपयांप्रमाणे 35 हजार 588 रूपये शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क जमा करण्यासाठी पालिका ठेकेदार नेमणार आहे. 

वाहनचालकांकडून अवाचा-सवा शुल्क घेण्यास सामाजिक संघटना, संस्था व विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. शहरात पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसताना बहुमताच्या जोरावर पार्किंग पॉलिसी राबविण्यात येऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. नागरिकांना  वाहन शुल्काचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या नव्या धोरणास शनिवारी होणार्या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवक विरोध करणार आहेत. तर, पाणीपट्टी दरवाढीप्रमाणे सदर विषयही बहुमताच्या जोरावर मंजुर करण्याचा निश्चय सत्ताधारी भाजपने केला आहे.