होमपेज › Pune › शहर ‘पार्किंग पॉलिसी’ अखेर मंजूर

शहर ‘पार्किंग पॉलिसी’ अखेर मंजूर

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:42AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी आणि वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे पालिकेच्या धर्तीवर ‘पार्किंग पॉलिसी’ तयार केली आहे. त्यामुळे शहरातील काही भागात रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वाहन लावताना सर्वच वाहनांना शुल्क द्यावे लागणार आहे. त्यास  सर्वसाधारण सभेने राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नोंदवून 25 टक्के सलवतीच्या उपसूचनेसह मान्यता दिली. 

शुक्रवारी (दि.22) झालेल्या मे महिन्याच्या तहकूब सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. स्थायी समितीने या पॉलिसीला 9 मे रोजीच्या सभेत मान्यता देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली होती. ही पॉलिसी पालिका प्रशासनाने तयार केली आहे. शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे असून वाहनसंख्या 16 लाख आहे. शहरात वाहन पार्किंग हा एक जटील प्रश्न बनला आहे. परदेशातील मेट्रो सिटी व देशातील दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरु, नागपूर या शहराच्या पार्किग पॉलिसींचा अभ्यास करून हे धोरण आखण्यात आले आहेत. या संदर्भात गटनेते व पदाधिकार्‍यांना दोन वेळा सादरीकरणही करण्यात आले होते. 

शहरात ज्या ठिकाणी दिवसभर 80 ते 100 टक्के पार्किंगची आवश्यकता आहे.  असे ठिकाण झोन ‘अ’ (उच्च पार्किंग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के आहे, असे ठिकाण झोन ‘ब’ (मध्यम पार्किंग), ज्या ठिकाणी 40 ते 60 टक्के पार्किंगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्किंग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्किंग) म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

रात्र निवासी पार्किंगसाठी वार्षिक शुल्क परवाना

निवासी पार्किंगसाठी रात्री 11 ते सकाळी 8 या वेळेसाठी मोटारी व टेम्पोसाठी 25 रुपये प्रतिदिननुसार 9 हजार 325 रुपयांचा वार्षिक परवाना आहे.दुचाकीसाठी 5 रुपयेप्रमाणे 1 हजार 825 रुपये, रिक्षासाठी 15 रुपयेप्रमाणे 5 हजार 475 रुपये,  मिनी बससाठी 38 रुपयेप्रमाणे 13 हजार 688 रुपये, ट्रकसाठी 55 रुपयेप्रमाणे 20 हजार 75 आणि खासगी बससाठी 98 रुपयेप्रमाणे 35 हजार 588 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागणार आहे. या शुल्कामध्ये 25 टक्के सूट उपसूचनेद्वारे देण्यात आली आहे.

केवळ याच परिसरात द्यावे लागणार शुल्क

सर्व बीआरटीएस रस्ते, पिंपरी कॅम्प बाजारपेठ, भोसरीगाव, नाशिक फाटा उड्डाणपूल चौक, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी रेल्वे स्थानक परिसर, देहू-आळंदी रस्ता, प्राधिकरण परिसर, भूमकर चौक ते केएसबी चौक रस्ता या मार्गावरच सशुल्क पार्किंग योजना पहिल्या टप्प्यात राबविली जाणार आहे. प्रत्येक तासासाठी दुचाकीला 2 रुपये, रिक्षासाठी 6 रुपये, मोटार व टेम्पोसाठी 10 रुपये, मिनी बससाठी 15 रुपये, ट्रकसाठी 33 रुपये व खासगी बससाठी 39 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामध्ये 25 टक्के सूट उपसूचनेद्वारे देण्यात आली आहे. गावठाण भाग, झोपडपट्टी वस्ती आदी भागांत ही पॉलिसी नसेल. सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा यांना शुल्क आकारण्यात येणार नाही. 

अगोदर शहरात पार्किंग विकसित करा

अश्‍विनी चिंचवडे, मीनल यादव, संदीप कस्पटे, सीमा सावळे, मंगला कदम, सचिन चिखले,  योगेश बहल, आशा शेंडगे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी या पॉलिसीला विरोध दर्शविला. प्रथम सार्वजनिक वाहतूक समक्ष करावी. आरक्षणातील जागेत पार्किंग विकसित करावे, अशी आग्रही मागणी केली. पॉलिसी नसतानाही शहरातील अनेक भागात सशुल्क पार्किंग राबविले जात असून त्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली. दुचाकींना शुल्क न घेण्याची मागणी मंगला कदम यांनी केली. माई ढोरे यांनी स्वागत केले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही पॉलिसी गरजेची असल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्त पाकिर्ंंग कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.