Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Pune › शहर भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

शहर भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:00AMपिंपरी : संजय शिंदे 

देशात, राज्यात भाजपवाल्यांना अच्छे दिन आहेत; परंतु पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पार्टीतील गटातटामुळे पक्षाच्या प्रतिमेबाबत ‘बुरे दिन’ सुरू असल्याची चर्चा पक्षातच आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणार्‍या पक्षाच्या विरोधातच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपसलेले उपोषणाचे हत्यार आणि सत्ताधारी नगरसेवकाने पक्षापासून सोडचिठ्ठी घेण्याचा घेतलेला निर्णय याबाबत शहर पक्षसंघटनेला आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचे पक्षांतर्गतच कुजबूज सुरू झाली आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात क्षेत्रीय सदस्य निवडीत पक्षाबरोबर सत्ता नसलेल्या काळापासून निष्ठावंत असणार्‍यांना डावललेच्या निषेधार्थ उपोषण केले. त्यामुळे पक्षाला ‘अच्छे दिन’ म्हणविणार्‍याच्या डोळ्यात झणझणीत अजनंच घालण्याचा प्रयत्न उपोषणकर्त्यांनी केला. भाजपाचा कारभार शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप , सहयोगी सदस्य आ. महेश लांडगे या जोडीकडे आहे. पक्षात संघटनेला नव्हे तर दोघांच्या मनसबदारीत ये-जा करणार्‍यांना पदे बहाल करण्यात आल्याची भावना निर्माण झाली; दोन कारभार्‍यांच्या विरोधात समोर उभे राहण्याचे कोणी धाडस  करत नव्हते ; तेथे त्यांच्या विरोधात उपोषण करण्याचे धाडस  निष्ठावंत कार्यकर्त्यानी केले.उपोषणाची घटना ताजी असतानाच भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब  ओव्हाळ यांनी देशात बहुजन समाजावर अन्याय वाढला आहे, दलित समाजाला सरकारी नोकरीत पदोन्नती थांबली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत, अँट्रोसिटी कायद्यात बदल झाल्याने कायदा पांगळा झाला आहे,  शहरात भाजपाची सत्ता येऊन वर्ष झाले, मात्र कचरा, पाणी यासारखे प्रश्न तडीस गेले नाहीत.  या पापांचा मला धनी व्हायचे नाही असे सांगत भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात एकच खळबळ उडाली. या गोष्टीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होण्यास मदत झाली आहे. 

ओव्हाळ यांनी धाडस करुन निर्णय जाहीर केला. ओव्हाळ यांच्या सारखीच अनेक नगरसेवकांची गळचेपी सुरू आहे; मात्र पक्षाविरोधी भूमिका घेतल्यास आपल्याला नगरसेवक पदापासून दूर व्हावे लागेल, अशी भिती असल्याने  अनेकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसत असल्याचे खासगीत बोलत  आहेत. या सर्व प्रकारामुळे अच्छे दिन फक्त नावालाच आहेत,  अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याचा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला बसू शकतो. त्यामुळे अशा घटनाना वेळीच आवर घालून पक्षातील खदखद सामोपचाराणे मिटविणे आवश्यक आहे. यासाठी शहर भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आल्याची चर्चा शहरात आहे.