Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Pune › बोर्ड बरखास्तीचा लाभ नागरिकांना होणार

बोर्ड बरखास्तीचा लाभ नागरिकांना होणार

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारने कॅन्टोन्मेंट बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यास, पुण्यातील तीन कॅन्टोन्मेंटचा कारभार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे जाईल. असे झाल्यास याठिकाणी महापालिकेचा कायदा लागू होऊन, नागरिकांना सुविधा मिळतील. मात्र बांधकामाबाबचे कॅन्टोन्मेंटचे कडक नियम हटल्याने सिमेंटचे जंगल विस्तारेल. असे झाल्यास हा परिसर बकाल होण्याचा धोका आहे. तसेच या मोकळ्या जागांच्या आसपास लष्कराची महत्त्वाची कार्यालये आहेत, त्यांनासुध्दा धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

देशात सुमारे 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या बोर्डाचा सर्व कारभार केंद्राच्या संरक्षण विभागाच्या मार्फत चालतो. त्यामुळे  कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांना बहुतांशी सेवासुविधा वेळेवर मिळत नाहीत. मात्र, शुक्रवारी देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होणार, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे दिवसभर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या पुणे, खडकी आणि देहूरोड बोर्डाच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पुणे, खडकी आणि देहूरोड या तीन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांना कॅन्टोन्मेंट कायद्यातील कडक नियमांमुळे अनेक सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. सर्वात मोठा प्रश्‍न म्हणजे घराचा. 

कॅन्टोन्मेंट हद्दीतील घरे दुररुस्त अथवा नवीन बांधण्यास कधीच लवकर परवानगी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबरोबरच जाचक अटीमुळे राज्य शासनाच्या असलेल्या कोणत्याही सुविधा अजूनही नागरिकांना मिळत नाहीत. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होऊन, ते जवळ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन झाल्यास नागरिकांना अनेक लाभ मिळणार आहेत.

याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणारे राहिवासी शशी पुरम म्हणाले, कॅन्टोन्मेंटच्या बरखास्तीमुळे या भागात राहणार्‍या  नागरिकांना खर्‍या अर्थाने लाभ होणार आहे. ज्याप्रमाणे शहरालगत असलेली 34 गावे महापालिकेत समाविष्ट झाली, त्या गावांचा विकास होत आहे. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंटचा विकास होण्यास मदत होईल. सध्या या भागात घरांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत घर बांधण्यास केवळ एकच एफ.एस.आय. आहे. तसेच नियमावली अत्यंत कडक आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कॅन्टोन्मेंट विलीन झाल्यास घरांची दुरुस्ती तसेच नवीन घरे बांधण्याचा मार्ग मोकळा होईल. नागरिकांचा विकास आणि इतर असलेल्या सेवासुविधा मिळण्यास मदत होईल. राजकीयदृष्ट्यासुध्दा या भागातील नागरिकांचा फायदाच होईल. काही तज्ज्ञांच्या मते तीनही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मोकळी जागा भरपूर आहे. बोर्ड बरखास्त झाल्यास त्या जागेवर सिमेंट जंगल उभे राहण्याचा धोका आहे. दरम्यान कॅन्टोन्मेंट बरखास्त झाल्यास स्वागत होईल, अशी प्रतिक्रिया पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी यांनी व्यक्त केली.