Sat, Jul 20, 2019 15:35होमपेज › Pune › समस्यांवरील तोडग्यासाठी नागरिकांचा पुढाकार!

समस्यांवरील तोडग्यासाठी नागरिकांचा पुढाकार!

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 12:34AMपुणे : मंगेश देशमुख

वाहतूक कोेंडीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला रस्ता म्हणजे पुणे-नगर आणि पुणे-नाशिक हा रस्ता  होय.  पुणे-नगरपेक्षाही पुणे-नाशिक रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते.  यातील चाकण,  मंचर, राजगुरुनगर आणि नारायणगाव ही वाहतूक कोंडीची मुख्य ठिकाणे.  शनिवारी सुटी आणि रविवारी आलेले रक्षाबंधन लक्षात घेता या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोेंडी होण्याची चिन्हे लक्षात घेत राजगुरुनगरमधील फेसबुक मित्र; तसेच मंचरचे सरपंच त्यांच्या सहकार्‍यांसह रस्त्यावर वाहतूक नियमन करण्यासाठी उतरल्याने प्रथमच सणाच्या दिवशी या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टळली.  याला जनसामान्याने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे.  पोलिसांचे अपुरे संख्याबळ हे कारण पुढे करणार्‍यांपुढे सामान्यांनी कसे वागले पाहिजे याचा धडा दिल्याने आता तरी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आपणच काळजी घेणे आवश्यक आहे. हा धडा यातून जिल्हावासीयांना मिळाला आहे.  यासह जिल्ह्यातील रोडरोमिओंनी घातलेल्या उच्छादाला लगाम घालण्यासाठी आता पोलिसांपेक्षा मुलांच्या पालकांसह मुलींच्या पालकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.  

बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि ओलाव्याचा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन.  सलग सुटीचे दिवस आल्याने रविवारी (दि. 26) राजगुरुनगरमधून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावर तसेच मंचर,  नारायणगाव आणि चाकण येथे वाहतूक कोंडी होणार हे निश्‍चितच.  त्यात पावसाची रिपरिप सुरूच.  त्यामुळे या रस्त्याने जाणे म्हणजे वेळेचा अपव्यय असेच काहीसे प्रवाशांनी ठरविले असणार;  मात्र याला जनसामान्यांनी छेद देत वाहतूक कोंडी एकदाची फोडली.  मोशी, मोशी गाव, देहू रस्ता, टोलनाका, चिंबळी,  कुरुळी येथील एमआयडीसी चौक, आळंदी फाटा, चाकण शहरातील तळेगाव चौक व आंबेठाण चौक, पुढे भीमा नदीजवळ चांडोली फाटा, राजगुरुनगर शहर आणि घाटरस्ता अशा ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होते. शनिवार,  रविवारची सलग सुटी आणि रक्षाबंधन म्हणून या मार्गावरची ही सर्व ठिकाणे वाहतूक कोंडीत अडकणार हे निश्‍चित होते;  मात्र  यावर उपाययोजना करण्यासाठी राजगुरुनगरमधील नंदकुमार मांदळे यांनी फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून संकल्पना मांडली. त्याला मित्रांनीही प्रतिसाद दिला.  

मांदळे यांच्या जवळपास 500 फेसबुकवरील मित्रांनी मोशी ते मंचर या भागातील वाहतूक नियंत्रणात सहभागी होण्याचे ठरवले.  चाकण-राजगुरुनगर या महत्त्वाच्या शहरांना जोडणारे रस्ते व यामधील गावे या ठिकाणी तरुणांनी दहा-दहा मित्रांचे गट करून रस्त्यावरील वाहनांना शिस्तीत प्रवास करण्यासाठी मार्गदर्शन केले. रविवारी रक्षाबंधन साजरे करून भल्यासकाळी हा मित्र परिवार विभागून महामार्गावर आला. हातात लाठी, तोंडात शिटी घेऊन मधुर आवाजात आडवे-तिडवे चालणार्‍या वाहनचालकांना शिस्तीत ये-जा करण्याचे आवाहन करू लागला. परिणामी महामार्ग,  घाटरस्त्यात किंवा शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.  अशीच स्थिती मंचरमध्येही होती. वाहतूक समस्या उद्भवू नये, प्रवाशांना मन:स्ताप होऊ नये,  यासाठी सरपंच दत्ता गांजाळे हे स्वतः मंचर बसस्थानकानजीक असणार्‍या पुणे-नाशिक रस्त्यावर सकाळी उतरले. शिटी वाजवत वाहनांनी येथे थांबू नये, यासाठी निर्देश देत होते. त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारीदेखील रस्त्यावर होते. त्यामुळे मंचर परिसरात नेहमीची  वाहतूक कोंडी जाणवली नाही. यावरून पोलिसांसोबत जनतेनेही त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे झाले आहे हे दिसून आले. 

रोडरोमिओंना आवर घालणे काळाची गरज

तरुणाकडून दिल्या जाणार्‍या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आकांक्षा प्रदीप दरेकर (वय 16,  रा.  दरेकरवस्ती, सोनगाव, ता. बारामती) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने बुधवारी (दि. 22) आत्महत्या केली आणि रोडरोमिओंचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला.  तरुणीच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी महेश नानासाहेब मासाळ (रा.  झारगडवाडी,  ता.  बारामती) याला अटकदेखील केली. मात्र केवळ यामुळे रोडरोमिओंचा प्रश्‍न सुटला असे म्हणता येणार नाही.  रोडिरोमिओंचा प्रश्‍न हा केवळ बारामती तालुक्यापुरता मर्यादित नसून, त्याची लागण संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे.  दौंडमध्ये तर केवळ रोडरोमिओला हटकले म्हणून  गणवेशधारी पोलिसाला महाविद्यालयासमोरच तीन अल्पवयीन टवाळखोरांनी मारहाण केली.  यामध्ये या टवाळखोरांचा बापदेखील सहभागी होता.  यावरच हे प्रकरण थांबले नाही; तर ही अल्पवयीन मुले आणि त्या बापाला अटक केल्यानंतर त्यांच्या नात्यातील असलेल्या एका पोलिसानेच  तक्रार दाखल केलेल्या मारहाणग्रस्त पोलिसाला पाहून घेण्याची धमकी दिली.  यावरून रोडरोमिओ आणि त्यांना पाठबळ देणार्‍यांची किती बडदास्त ठेवली जाते हे लक्षात येण्याजोगे आहे.

या दोन घटनांशिवाय इंदापूर आणि मंचरचे बसस्थानक या मवाल्यांचा अड्डा बनले आहे.  शिरूर,  सासवड,  भोर येथे यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही.  इंदापुरातही एका मुलीचा पाठलाग करणार्‍या गावातीलच रोडरोमिओवर गुन्हा दाखल झालेला आहे; मात्र बर्‍याचवेळा कुटुंबाची बदनामी म्हणून मुलीचे पालक पुढे येत नाही; तर दुसरीकडे बडेजाव मिरविण्यासाठी काही पालकही आपल्या अल्पवयीन पाल्यांकडे बिनदिक्कत दुचाकी देतात;  त्यामुळे टवाळखोरांचे फावते.  हे टाळण्यासाठी मुलींच्या पालकांनी तक्रारीसाठी पुढे येण्याची गरज असून, मुलांच्या पालकांनीही मुलांना दुचाकी देणे टाळणे व वेळप्रसंगी त्याला कडक तंबी देणे आवश्यक झाले आहे. 

पिकांबाबत ‘कही खुशी कही गम’ 

जिल्ह्यातील धरणसाखळीत जादा पाणीसाठा झाल्याने धरणातून कमी-अधिक प्रमाणात पाणी सोडणे एक महिन्यापासून सुरू आहे.  परिणामी पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 100 टक्के भरले.  उजनी भरल्याने तिन्ही जिल्ह्यांची तहान भागण्याची चिंता मिटली असली तरी पाऊस रुसलेला असल्याने जिल्ह्यातील बारामती,  इंदापूर,  शिरूर,  दौंड आणि पुरंदर या तालुक्यांत दुष्काळी स्थिती कायम आहे.  पावसाने वरील पाच तालुके वगळता सर्वत्र चांगली हजेरी लावली.  विशेषतः या भागातील ओढे,  नाले,  नद्या खळाळून वाहू लागल्या;  त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केलेले असताना वरील चार तालुक्यांत मात्र पावसाळ्याचे तीन महिने उलटल्यानंतरही दुष्काळी स्थिती कायम आहे.  गेल्या आठवडाभरापासून पुणे धरणसाखळी क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसाने पुणे धरणसाखळी क्षेत्रातील धरणे भरून अतिरिक्त पाणी उजनीत वेगाने येऊन स्थिरावलेे.  त्यामुळे धरण 100 टक्के भरले.  असे असले तरी पुणे धरणसाखळी क्षेत्र वगळता पुणे जिल्ह्यातील बारामती,  दौंड,  इंदापूर,  हवेली,  पुरंदर तालुक्यांत पावसाने दडीच मारलेली आहे.  साहजिकच बळीराजामध्ये आजही चिंतेचे वातावरण आहे.  यावरून जिल्ह्यात पावसाबाबत ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे.