Fri, Jul 19, 2019 20:00होमपेज › Pune › अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:09AMपिंपरी : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीकडे वेगाने वाटचाल करणार्‍या पिंपरी-चिंचवडमध्ये घाणीचे साम्राज्य असून, ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग, तुंबलेली गटारे व डुकरांचा तसेच  जनावरांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण आहेत. शहरात तुंबलेल्या गटारांमुळे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिक आजारी पडत आहेत. याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असून, पावसाळ्याच्या तोंडावर नाल्यांची सफाई करावी; तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होऊ लागली. 

शहरातील विविध भागात गटारांची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी डुकरांना पोषक वातावरण तयार होत आहे. ही डुकरे गटारीतच ठाण मांडून बसत आहेत. तसेच, गटारातून बाहेर पडून डुकरे संबंधित परिसर घाण करत असून, यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच, डुकरांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असून अनेक ठिकाणी डुकरांपासून बचाव करत रस्ता पार करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. 

स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष

शहरात  विविध  भागात गटारे तुंबून ते पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे. स्वच्छतेअभावी अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. स्थानिक नगरसेवकांचेही सध्या विकासकामांऐवजी केवळ लग्नसमारंभांवरच लक्ष असल्याने परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.  त्यातच शहरातील अनेक रस्त्यांवर साचलेले कचर्‍याचे ढीग, तुंबलेल्या उघड्या गटारी, नाल्यांमध्ये पसरलेले घाणीचे साम्राज्य, डुकरांचा वाढता वावर, नदीकाठच्या परिसरात साचणारे कचर्‍याचे ढीग यामुळे शहरात विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून,

शहरात नव्याने स्वच्छता अभियान राबवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर साचलेले कचर्‍याचे ढीग, उघड्या गटारी, नाल्यांमध्ये पसरलेले घाणीचे साम्राज्य, डुकरांचा वाढता वावर, नदी व नदीकाठच्या भागात वाढणारे कचर्‍याचे ढीग या प्रकारामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या अस्वच्छतेत आणखी भरच पडत आहे.