Thu, Aug 22, 2019 11:03होमपेज › Pune › शिल्प उभारणीचे काम नागरिकांनी पाडले बंद

शिल्प उभारणीचे काम नागरिकांनी पाडले बंद

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 2:18AMपुणे : देवेंद्र जैन

गेली अनेक वर्षे शहराला भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे प्रयत्न एकीकडे सुरू असताना, त्याला खो घालण्याचा सुरू असलेला प्रयत्न लक्ष्मी रस्त्यावरील विजय चित्रपटगृह परिसरातील नागरिकांनी उधळून लावला. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 18 फूट बाय 12 फुटांचे कायमस्वरूपी विशाल शिल्प उभारण्याचे काम विजय टॉकीज चौकातील वाहतूक बेटावर मंगळवारी सुरू करण्यात आले होते. मात्र, येथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध करीत, काम बंद करण्यास भाग पाडले. 

हे शिल्प नगरसेवक राजेश येनपुरे यांच्या विकास निधीतून होणार असल्याचे मनपाचे अभियंता संभाजी खोत यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक याच प्रभागाचे नेतृत्व करतात. यासंदर्भात राजेश येनपुरे, हेमंत रासने यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही; तर गायत्री खडके यांनी शिल्प उभारण्यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या परदेश दौर्‍यावर असल्याचे समजले. विशेष म्हणजे हे चारही सदस्य सत्ताधारी भाजपचे आहेत.

श्री गजानन मंडळाचे कार्याध्यक्ष अमेय गाडे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा याला विरोध आहे.  यासंदर्भात ‘पुढारी’शी बोलताना गाडे म्हणाले की, या जागेवर पूर्वी विठ्ठल-रखुमाईचे मोठे मंदिर होते. ते मंदिर 70 च्या दशकात मनपाने काढून टाकले. आता तेथे फक्त शेडगेंचे छोटे समाधी मंदिर आहे. जर हे शिल्प उभारले तर गणेशोत्सवामध्ये याचा नागरिकांना  त्रास होईल, तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीचा हा मुख्य मार्ग आहे; हे शिल्प मिरवणुकीला मोठा अडथळा ठरेल. 

तसेच या शिल्पामध्ये एकूण 9 मूर्ती असल्याचे मनपा अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मग विसर्जन मिरवणुकीदरम्यान जर काही तोडफोड झाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला कोण जबाबदार, असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमचा या शिल्पाला विरोध नाही, पण ते ज्या ठिकाणी बसवणार आहेत, त्याला आमचा विरोध आहे. हे शिल्प संभाजी पोलिस चौकीच्या शेजारी बसवावे, म्हणजे त्याचे योग्य प्रकारे संरक्षण होईल. अत्यंत संवेदनशील असलेल्या जागी अशा प्रस्तावांना महानगरपालिका मान्यता का देते, असा गंभीर प्रश्नही गाडे यांनी यावेळी उपस्थित केला. 
शहर सुशोभीकरणाच्या नावावर पुणेकरांचे लाखो रुपये खर्च केले जात आहेत.  शहरातील नागरिकांसमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या असताना, नगरसेवक मनमानी करत आहेत. यात प्रशासनाच्या मुख्य अधिकार्‍यांनी अथवा आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.