Sun, Aug 25, 2019 12:53होमपेज › Pune › हॉस्पिटलचा कचरा टाकल्याने नागरिक, प्राण्यांना धोका

इंजेक्शन, सुयांचा ‘तळजाई’वर  ढिग!

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 12:27AMपुणे : अपर्णा बडे 

शहरातील प्रदूषणापासून थोडे दूर जाऊन मोकळा श्‍वास घेण्यासाठी तळजाई टेकडीवर रोज गर्दी होते मात्र, येथे चक्क  वापलेली इजेक्शन, सुया, रक्त लागलेली बँडेज,सलाईन बाटल्या आणि औषधांच्या बाटल्यांसारख्या वैद्यकीय कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे. वनविभागाच्या ‘संरक्षित’ जागेत या प्रकारामुळे याठिकाणी येणार्‍या नागरिकांबरोबरच प्राण्यांवरही विपरीत परिणाम होणार आहे.

वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या तळजाई टेकडीवर संरक्षित भिंतीच्या बाजूला असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अज्ञांतांकडून जैववैद्यकीय  कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा आरोग्यास हानीकारक असून प्राण्यांना देखील यामुळे धोका निर्माण झाला आहे. यामध्ये  मुदतबाह्य औषधांचा साठा, इंजेक्शन्स, इंजेक्शनच्या वापरलेल्या सुया, विविध अँटिबायोटिक्स, सलाईनच्या प्लास्टिक बाटल्या अशा स्वरुपाचा कचरा उघड्यावर टाकला आहे. हा कचरा कुठल्यातरी आसपासच्या हॉस्पिटलमधून आणला जात असावा अशा संशय येथे फिरायला येणार्‍या नागरिकांना आहे. 

कायदा काय सांगतो?

कायद्यानुसार रुग्णालयांना नोंदणी करतानाच जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीबाबत उपाय-योजना बंधनकारक असते. या कचर्‍याची आधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाते. मात्र हा खर्च टाळण्यासाठी काही हॉस्पिटलकडून हा धोकादायक कचरा शहरात कुठेही टाकला जात आहे. 

ढीगच्या ढीग...!

हा कचरा खूप वर्षांपासून टाकण्यात येत असून याचे ढीग सध्या टेकडीवर दिसून येत आहेत. येथे फिरण्यास येणार्‍या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काय धोका असू शकतो? 

बँडेज, सुया यामुळे हवेत जंतु पसरण्याची शकयता असते, तसेच अशा कच-यावर माशा बसून हे जंतु इतरत्र पसरले जातात. या अशा प्रकारच्या कचर्यामुळे कॉलरा, टॉयफॉईड अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता अधिक असते अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 

सुरक्षा रक्षकच करतात काय?

तळजाई टेकडीच्या सुरक्षतेसाठी अनेक वर्षे वनविभागाकडून सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. अशा परिस्थितीचा फायदा घेत अनेकदा येथे राडारोडा  टकाण्याचे प्रकार, झाडे जाळण्याचे प्रकार सतत घडतात मात्र सध्या तेथे जैव वैद्यकीय कचराही मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्यामुळे  फिरायला येणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.