Tue, Jul 16, 2019 22:32होमपेज › Pune › ‘सेल्फी विथ खड्डे’ अभियानास नागरिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सेल्फी विथ खड्डे’ अभियानास नागरिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:25PMपिंपरी : प्रतिनिधी 

जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून अक्षरशः चाळण झाली आहे. त्या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सेल्फी विथ खड्डे’ छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यास दोन दिवसांतच मोठा प्रतिसाद मिळाला असून, शहरातील विविध भागांतील तब्बल 150 छायाचित्रे प्राप्त झाली आहेत. 

शहरात मोठ्या संख्येने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांना त्रास होत आहे. त्या संदर्भात तातडीने दुरुस्ती काम करून खड्डे बुजविण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाने तातडीने खड्डे न बुजविता खोटी आकडेवारी देऊन बोळवण केल्याचा आरोप साने यांनी केला. हे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून राष्ट्रवादीने ‘सेल्फी विथ खड्डे’ अभियानअंतर्गत छायाचित्र पाठविण्याचे आवाहन मंगळवारी (दि. 17) नागरिकांना केले होते. प्रत्येक छायाचित्रास 100 रुपये देण्यात येणार आहेत. त्यास शहरातील विविध भागांतील नागरिकांनी छायाचित्रे पाठवून प्रतिसाद दिला. बुधवारी (दि. 18) व गुरुवारी (दि. 19) असे दोन दिवसांत तब्बल 150 छायाचित्रे प्राप्त झाले आहेत. ती छायाचित्रे आमदार, महापौर व आयुक्तांना टॅग केले जाणार आहेत. त्याची दखल घेऊन सदर खड्डे दुरुस्तीची मागणी विरोधी पक्षनेते साने यांनी केली आहे.