Mon, Jun 17, 2019 03:09होमपेज › Pune › सिगारेट न ओढणार्‍यांनाही कर्करोगाचा धोका!

सिगारेट न ओढणार्‍यांनाही कर्करोगाचा धोका!

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

धूलिकण, वाहनांतून बाहेर पडणारा धूर यांच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणातील प्रदूषणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे; तसेच रोज तीन ते चार सिगारेट ओढण्याइतकी ही प्रदूषित हवा श्‍वासोच्छवासाद्वारे फुप्फुसात गेल्याने इतर विकारांबरोबरच फुप्फुसाच्या कर्करोगाचाही धोका वाढला आहे. त्यामुळे आता शहरात श्‍वास घेणेही तितके सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. 

महापालिकेच्या पर्यावरण अहवालात पुण्यातील हवा प्रदूषित झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. अहवालानुसार वाहनांमधून बाहेर पडणार्‍या धुरातून सल्फर, नायट्रोजन, कार्बन हे शरीरास घातक असलेले वायू हवेत मिसळत आहेत. त्यामुळे सल्फरच्या संयोगामुळे हवेत तरंगणार्‍या धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम श्‍वसनयंत्रणा आणि अप्रत्यक्षपणे फुप्फुसावर पडत आहे. त्यामुळे दम लागणे, श्‍वसनाचे विकार, दमा असे आजार जडत असून, त्यात आता कर्करोगही होत असल्याचा धोका वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष करून हडपसर आणि मंडई येथे प्रदूषणाची पातळी अधिक  आहे.

सध्या शहरातील हवेत धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ‘पीएम 10’ आणि ‘पीएम 2.5’ या धूलिकणांची पातळी वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणातही वाढ होत आहे. प्रदूषण वाढत असले तरी श्‍वासोच्छवासामुळे ते फुप्फुसात गेल्याने फुप्फुसाचा कर्करोग होत असल्याचे थेट निरीक्षण किंवा अभ्यास अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. पण, त्यामुळे धोका निश्‍चित वाढला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत रुबी हॉल क्‍लिनिकचे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी म्हणाले, ‘सध्या एकूण होणार्‍या कर्करोगापैकी फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण हे 10 ते 15 टक्के आहे. हवेतील प्रदूषणामुळे होत असल्याचे प्रत्यक्ष सिद्ध झालेले नाही; पण धोका मात्र वाढला आहे.’

फुप्फुसविकार तज्ज्ञांच्या मते फुप्फुसाचा कर्करोग हा छुपा आहे. अनेक वेळा तो तिसर्‍या किंवा चौथ्या स्टेजला असतानाच त्याचे निदान होते. त्यामुळे रुग्ण वाचण्याची शक्यताही कमी असते. प्रामुख्याने सिगारेट ओढल्याने किंवा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे सिगारेटमधील निकोटिन हा घटक फुप्फुसात गेल्याने कर्करोग होतो.