Sat, Feb 23, 2019 22:54होमपेज › Pune › गणेशोत्सवात चायनीज वस्तूंचा बोलबाला!

गणेशोत्सवात चायनीज वस्तूंचा बोलबाला!

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 06 2018 11:33PMपिंपरी ः प्रतिनिधी

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना शहरवासीय उत्सवाची तयारी करण्यात व्यस्त आहेत. यासाठी सजावटीचे विविध सााहित्य दाखल झाले असून यंदाही चायनीज मालाचा बोलबाला बाजारात दिसत आहे. 

गौरी-गणेशोत्सवासाठी शहरात दुकाने सजली असून, बाजारात आजही चायना मेडचा बोलबाला आहे. आजही मंदिर, मोत्याच्या माळा, इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत सारे काही चायना मेड बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. भारतीय सातत्याने चिनी मालावर बहिष्कार टाकत असूनही महाराष्ट्रात तर चिनी मालाची होळी करण्यात आली होती. अनेकांनी तेव्हापासून स्वदेशी मालाची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु  येरे माझ्या मागल्या.. म्हणत यंदा मात्र गणेशोत्सवासाठी सर्रास चिनी मालाची खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. 

चिनी माल आकर्षक  व स्वस्त असल्याने आजही ग्राहकांना चिनी मालाची भुरळ पडत आहे. सजावट साहित्यामध्ये बाजारात एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, रंगीबेरंगी पताका व तसेच अनेक प्रकारचे स्वदेशी साहित्य उपलब्ध झाले आहे. स्वदेशी माल टिकाऊ व चांगला आहे. मात्र, चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा दर जास्त असल्याने ग्राहक चायना मालच जास्त खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

प्लास्टिक बंदीमुळे किमती वाढल्या... 

राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी केल्याने गौरी गणपतीच्या सजावटीचे साहित्य स्वदेशी पध्दतीने बनवण्यात आले आहे; मात्र चायनीज मालाच्या तुलनेत किमती जास्त असल्याने चायनीज मालाला आजही मागणी अधिक आहे; तसेच यंदा नव्याने लाकडी व कागदी वस्तू गणेशोत्सवासाठी बाजारात दाखल झाल्याने नागरिकांसाठी आकर्षणाचा भाग ठरत आहे. मात्र, याच्या किमती अधिक असल्याने ग्राहकांनी या मालाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी हटवण्याची मागणी आजही जोर धरत आहे. परंतु याचा परिणाम म्हणून चायनीज मालाची मागणी वाढत असून, मागील वर्षाच्या तुलनेत चायनीज मालाला होणारा विरोध यंदा मावळल्याचे दिसत आहे.