Tue, May 21, 2019 23:07होमपेज › Pune › चिंचवडचे पदपथ परप्रांतीयांकडून ‘हायजॅक’

चिंचवडचे पदपथ परप्रांतीयांकडून ‘हायजॅक’

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 1:47AM

बुकमार्क करा
पिंपरी ः प्रतिनिधी

चिंचवड येथील पिंपरीकडे जाणार्‍या लिंकरोडवरील पदपथांवर सध्या परप्रांतीयांनी अतिक्रमण केले असून, यामुळे पादचार्‍यांना चालणे मुश्कील झाले आहे.  चिंचवड गावातील पदपथांवरून नागरिकांना चालणे अवघड झाले असून, पदपथांवर राजरोस लोखंडी भांडी मांडून त्यांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे जवळच एका स्थानिक नगरसेवकाचे निवासस्थान असून, या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींचेच दुर्लक्ष होत आहे. पदपथांवर नागरिकांना चालण्यास तसूभरही जागा उरली नसून, रस्त्यावर उतरून रहदारीतून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे पदपथ हे पादचार्‍यांसाठी की परप्रांतीयांसाठी, असा संतप्‍त सवाल नागरिकांनी केला आहे. 

केवळ चिंचवडमध्येच नव्हे, तर शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यालगतच्या पदपथांवरच परप्रांतीयांनी आपला माल मांडला आहे. त्यांना अनेकदा सांगूनही काही फरक पडत नसून, दिवसेंदिवस त्यांची मुजोरी वाढतच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे नागरिक  त्रस्त झाले असून, नागरिकांना वाहने चुकवून चालावे लागत आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना चिरीमिरी मिळत असल्यानेच या परप्रांतीयांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

परप्रांतीयाबरोबर भाजीपाला विकणारे हातगाडीवाले पूर्णपणे पदपथांवरच ठाण मांडून असतात. त्यामुळे सायंकाळी भाजी व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची पदपथांवर मोठी गर्दी होते. गेले कित्येक दिवस महापालिकेकडून कारवाई झाली नसल्याने या विक्रेत्यांची भीड चेपली आहे. दिवसेंदिवस या प्रकारात भरच पडत असून, जो तो माल घेऊन पदपथांवर मांडून विकत असल्याचे दिसत आहेत. चिंचवडमधील अंतर्गत भागात सायंकाळी सहानंतर मोरया गोसावी स्टेडियम, केशवनगर, राज पार्क परिसरातील पदपथांवर पाणीपुरीवाले, ब्लँकेट; तसेच नारळपाणी विकणार्‍यांची संख्या वाढत असून, आठवडे बाजाराच्या दिवशी नागरिकांना जीव मुठीत धरून घरी जावे लागत आहे.