Mon, May 27, 2019 01:28होमपेज › Pune › चिंचवडला ‘बटरफ्लाय ब्रीज’

चिंचवडला ‘बटरफ्लाय ब्रीज’

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:08AM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रसूनधामशेजारी 18 मीटर डीपी रस्त्यास थेरगाव-चिंचवड असा ‘बटरफ्लाय ब्रीज’ बांधण्यात येणार आहे. सदर पुलामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडून, मोरया गोसावी मंदिर, जिजाऊ पर्यटन केंद्राशेजारी  एक पर्यटनस्थळ विकसित होईल. 

सदरचा पूल डांगे चौक रस्ता ते एम्पायर इस्टेट पुलाकडे पवना नदीकडेने जाणार्‍या 18 मीटर डीपी रस्त्यास जोडणारा आहे. पुलाची एकूण लांबी  107.575 मीटर असून, पुलाची रुंदी  16.200 मीटर असणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंस तीन मीटरचे पदपथ देण्यात आले आहेत. फुलपाखरू डिझाईनच्या कमानीची एकूण लांबी  100 मीटर असणार आहे. पुलास मध्यभागी दुभाजक असून, पुलावरून ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंस दोन-दोन लेन प्रस्तावित आहेत. पुलाला जोडण्यासाठी दोन्ही बाजूंस पोच रस्ता दिलेला आहे. विद्युत रोषणाईसाठी दोन्ही बाजूंस आकर्षक विद्युत खांब दिलेले आहेत.

पुलाचे डिझाईन आकर्षक करण्यासाठी पुलाला दोन्ही बाजूंस फुलपाखराच्या पंखाच्या आकाराच्या आकर्षक लोखंडी कमानी दिलेल्या असून त्यांचे वजन घेण्यासाठी सस्पेंडर बारचा वापर केलेला आहे. नागरिकांसाठी पुलावरून नदी परिसराचे दृश्य पाहण्यासाठी पुलाच्या मध्यभागी दोन्ही बाजूंस दोन मीटर रुंदीच्या व्हीविंग गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे. सदर पुलासाठी नदीपात्रामध्ये कॉलम नसल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला कसलाही अडथळा येणार नाही.

या पुलामुळे पिंपरी-चिंचवड लिंक रोड; तसेच चिंचवड स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावरील वाहतुकीचा  ताण कमी होण्यास मदत होईल. चिंचवड, केशवनगर, तानाजीनगर या भागातील नागरिकांना मुंबई-पुणे रस्त्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वापरता येईल. त्यामुळे चिंचवड बाजारपेठेतील वाहतुकीवरील ताण कमी  होईल. नाशिक फाटा येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिशय सुंदर दुमजली पूल बांधला आहे, त्यामुळे शहराचे सौंदर्य खुलले आहे. थेरगाव-चिंचवड नियोजित ‘बटरफ्लाय ब्रीज’ (फुलपाखरू पूल) मुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.